सांगली : मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करताना तो निर्णायक होण्यावर कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमत झाले असून बैठकीतील मागण्या राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा असेही ठरल्याची माहिती सामितीचे कार्यकर्ते विलास देसाई यांनी येथील बैठकीनंतर दिली. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणार्या सर्व रेल्वेमधून मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते 8 ऑगस्ट रोजी विनातिकीट जातील. सर्व रेल्वेंचा ताबा आम्ही घेणार असल्याने त्यावेळी अन्य प्रवाशांची गैरसोय नको म्हणून आम्ही आजच त्यांना 8 ऑगस्टला प्रवास न करण्याचे आवाहन करीत आहोत,असे सांगत ट्रॅव्हल कंपन्यांनीही आम्हाला त्यादिवशी मोफत बसेस पुरवाव्यात, अन्यथा आम्ही त्यादिवशी त्या चालवू देणार नाही, असेही ते म्हणाले. मार्केट यार्डमधील सभागृहात मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत होणार्या 9 ऑगस्टच्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.
काय घडले बैठकीत?
मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मराठा क्रांती मोर्चाने मुंबईतच तळ ठोकावा. प्रसंगी विधानसभेचा ताबा घ्यावा, अशी निर्णायक आंदोलन करण्याची मागणी शनिवारी मराठा कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. कार्यकर्त्यांच्या या मागण्या राज्याच्या समितीकडे पाठविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
समाजामध्ये एकमेकांत आपला समन्वय हवा. अॅट्रॉसिटीबद्दलही समाजातील लोकांमधून वेगवेगळी मते येत आहेत. त्यामुळे कोणत्याही मागण्या व भूमिकेबाबत सर्वांची एकवाक्यता दिसायला हवी. मुंबईतील आंदोलन निर्णायक होण्यासाठी आपण त्याठिकाणी थांबलेच पाहिजे. थांबल्याशिवाय राज्यकर्ते घाबरणार नाहीत.
– मनीषा माने, कार्यकर्त्या
समाजासाठी काम करण्याची इच्छा असेल त्यांनी नावनोंदणी करावी. मुंबईतील मोर्चात काम करण्याचीही त्यांना संधी दिली जाईल. कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्व मागण्यांचा विचार आम्ही करू. त्या मागण्या राज्याच्या समितीपुढेही मांडण्यात येतील.
– संजय देसाइ, कार्यकर्ता