धुळे । भीमा-कोरेगाव घटनेनंतर धुळे बंद दरम्यान झालेल्या दगडफेकी विरोधात तसेच शहरात वाढलेली गुन्हेगारी यासह विविध मागण्यांसाठी आज धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होतेे. धुळे बंद दरम्यान झालेल्या मोर्चात तडीपार गुंडांचा सहभाग असल्याचा आरोप करीत शहरात वाढती गुंडगिरी, वाढती अपप्रवृत्ती या विरोधात आज महामोर्चा निघाला. आग्रारोडने मोर्चा मार्गक्रमण केले. या आधी तरूणांनी मोटारसायकल रॅली काढला. शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चा पार पडला. हा मोर्चा कुठल्याही जाती,धर्माविरोधात नसल्याने या मोर्चाला प्रतिसाद लाभला.
गुंडगिरीमुक्त धुळे शहराची मागणी
उत्साहात पण तितक्याच शिस्तीत आणि नियोजबध्दपणे निघालेल्या या मोर्चामुळे पोलिसामध्येही ’तणावमुक्त’ वातावरण दिसून येत होते. छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्यांना शासन, राष्ट्रहितासाठी समान नागरि कायदा झालाच पाहीजे, गुंडगिरीमुक्त धुळे शहर झालेच पाहीजे, तडीपारांविरुध्द कठोर कारवाई झालीच पाहीजे, या प्रमुख मागण्यांचा या महामोर्चात सहभाग होता. मोर्चाला सुरवात झाली तेंव्हा मोर्चाचा अग्रभाग हा धुळे महानगर पलिकेजवळ होता तर मोर्चाचे शेवटचे टोक हे आग्रारोडवरील राजकमल टॉकीजजवळ असल्याचे निर्दशनास येत होते. सर्वच जाती धर्माचे शिवप्रेमी व व्यापारी, व्यावसायिक या महामोर्चात सहभागी झाले होते.