औरंगाबाद : ‘मराठा क्रांती मोर्चा हे नाव समाजाची आस्था आहे .सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठीच हे नाव वापरले जावे. वैयक्तिक, पक्ष, संघटना बांधणीसाठी कुणी या नावाचा वापर करताना आढळल्यास समन्वयक आणि समाज त्यांना रोखठोक उत्तर देतील,’ असा ठराव मोर्चातर्फे आयोजित समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी १६ सप्टेंबर रोजी टीव्ही सेंटर, हडको परिसरात नुकतीच बैठक झाली. मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरून राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा करण्यात येत आहे. याची दखल घेत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये समन्वयकांनी आपली मते यावेळी मांडली.
‘मराठा क्रांती किंवा सकल मराठा या नावाने कुणी पक्ष काढत असेल तर, होणाऱ्या परिणामांना ते स्वत जबाबदार राहतील. मराठा क्रांती ही समाजाची आस्था आहे. ज्या वेळेस सामाजिक एकता, अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा असेल त्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा ताकतीने त्या आंदोलनात उभे राहील. त्याचा उपयोग कुणीही वैयक्तिक कामासाठी किंवा पक्ष, संघटना बांधणीसाठी करू शकत नाही. असे काही आढळल्यास मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी (समन्वयक) रोखठोक पद्धतीने उत्तर देतील, असा एकमताने ठराव यावेळी करण्यात आला.
या बैठकीला प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, अंकत चव्हाण, विजय काकडे, प्रदीप हारदे, रामेश्वर राजगुरे, बाळासाहेब औताडे, संदीप सपकाळ, रमेश गायकवाड, अॅड. सुवर्णा मोहिते, सुनील कोटकर, शिवाजी जगताप, प्रशांत शेळके, योगेश औताडे, सतीश वेताळ आदींची उपस्थिती होती.