मराठा, मुस्लीम व धनगर समाज आरक्षणाचा ठराव एकमताने पारीत

0

रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत निर्णय

रावेर- रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सोमवारी मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला तर कापूस, मका, केळी व मार्केट फी मधून समितीला 23 लाखांचा नफा बाजार समितीला झाला असून यापुढे शॉपिंग कॉम्प्लेक्स, चाळणी यंत्र या संदर्भात बाजार समिती पुढे काम करणार असल्याचे सभापती निळकंठ चौधरी यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.

यांची होती सभेला उपस्थिती
यावेळी विशेष सर्वसाधारण सभेला तालुक्याचे माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, संचालक श्रीकांत महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, पितांबर पाटील, विनोद पाटील, कैलास सरोदे, प्रमोद धनके, अजगर तुकडू, कल्पना पाटील, संगीता वाणी, पंडित कोळी, उस्मान मेहमूद, डॉ.सुभाष पाटील, खरेदी-विक्री संघ चेअरमन जिजाबराव चौधरी, आर.डी.पाटील, मोहन काशीनाथ पाटील, पी.आर.चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, व्यापारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विकासो सदस्य उपस्थित होते. बाजार समितीच्या जमा-खर्चाची माहिती बाजार समिती सचिव गोपाळ महाजन यांनी उपस्थितांना दिली.

एकोप्याने बाजार समितीचा विकास
कृषी उपन्न बाजार समितीत सर्वपक्षीय संचालक असून सर्वाचे एकच उद्दिष्ट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा विकास व्हावा. त्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नकरीत असल्याचे मनोगतात माजी आमदार अरुण पाटील यांनी सांगितले.