मराठा मोर्चासाठी मुंबई महापालिका पुरवणार मोफत सेवासुविधा

0

मुंबई | मराठा क्रांती मोर्चा मोर्चासाठी 9 ऑगस्टला मुंबईत येणाऱ्या लाखो मराठा बांधवांना मोफत सेवासुविधा पुरविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. याआधी शुल्क भरल्याशिवाय मराठा मोर्चाला सेवासुविधा पुरवणार नाही, असा पवित्रा मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र, त्याबाबत मराठा समाजात नाराजीची भावना होती. ‘मातोश्री’ला राज्यभरातील मराठा आमदारांनी ‘समज’ दिल्यानंतर अखेर मुंबई महापालिकेने फक्त शौचालय व पिण्याचे पाणीच नाही तर, वैद्यकीय सेवाही मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 110 डॉक्टरांचे पथक मोर्चेकर्‍यांच्या सेवेला तैनात राहील.

मुंबईत निघणार्‍या कोणत्याच मोर्चाला सेवासुविधा पुरवण्यात येत नाही. त्यामुळे मराठा मोर्चाला सुविधा पुरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सेवासुविधा हव्या असतील तर, शुल्क भरा, असे महापालिकेने यापूर्वी सांगितले होते. पालिकेच्या या मराठाविरोधी भूमिकेबाबत सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा मोर्चाला सेवासुविधा पुरवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक जण पुढे आले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राज्यभरातील मराठा आमदार, पदाधिकारी यांनी यासंदर्भातील नाराजी पक्षाविरोधात जाऊ शकते, याची जाणीव करून दिली. उद्धव यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. अखेर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा मोर्चाला मोफत सेवा पुरवण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले. त्यामुळे पालिका प्रशासनाने नमते घेत या सेवासुविधा पुरवण्यासाठी उपायुक्त आनंद वाघराळकर यांची नियुक्ती केली.

मोर्चेकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मोर्चाच्या मार्गात 7 ठिकाणी 15 फिरत्या शौचालयासह 8 मोठे पिण्याच्या पाण्याचे टँकर ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर सहा ठिकाणी वैद्यकीय पथके ठेवण्यात येणार आहेत. या पथकात 10 महिला व 10 पुरूष डॉक्टर राहणार आहेत. त्याशिवाय टोईंग गाड्याही ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

फिरती शौचालये
माटुंगा, प्रतीक्षा नगर नाला : 2
माटुंगा, जे. के. केमिकल नाला : 3
बीपीटी, सिमेंट यार्ड : 4
भायखळा, ई. एस. पाटनावाला मार्ग : 2
ह्युम हायस्कूल, एटीएस कार्यालय : 1
हज हाऊस : 1
आझाद मैदान : 2

पाण्याचे टँकर
वसंतदादा पाटील इंजिनीयरिंग कॉलेज, सायन : 2
बीपीटी, सिमेंट यार्ड : 4
राणीबाग : 1
आझाद मैदान : 1

वैद्यकीय पथके
प्रियदर्शनी : 10 पुरूष व 10 महिला डॉक्टर
राणीबाग : 10 पुरूष व 10 महिला डॉक्टर
जे. जे. उड्डाणपुलाजवळ : 10 पुरूष व 10 महिला डॉक्टर
सीएसटी रेल्वे स्टेशन : 10 पुरूष व 10 महिला डॉक्टर
आझाद मैदान : 10 पुरूष व 10 महिला डॉक्टर
बीपीटी सिमेंट यार्ड : 5 पुरूष व 5 महिला डॉक्टर