मराठा मोर्चा आणि निकाल : एक बादरायण संबंध!

0

महाराष्ट्रात निघालेले मराठा क्रांती मोर्चे सरकारविरोधात व्यक्त झालेला रोष होता यात शंका नाही. प्रारंभीच्या काळात निघालेले मराठा मोर्चे गरीब मराठ्यांनी कसे पदरमोड करून, घरातली आबालवृद्ध सहभागी होऊन काढले आणि त्यानंतर सगळ्या पक्षांतील धनदांडगे मराठे कसे सहभागी झाले. पैसा, रसद पुरवून त्याचा इव्हेन्ट कसा केला हे सगळ्यांनी पाहिले आहे. या सहभागाने प्रामाणिक मराठ्यांच्या हेतूबाबत शंका घेण्याचे कारण नाही, पदरमोड ते इव्हेन्ट या प्रवासात सामान्य मराठ्यांचा हेतू कुठेही डळमळीत झाला नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. कोपर्डी अत्याचार चीड, आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी हे प्रमुख विषय जसा मोर्चा विस्तारित होत गेला तसे विस्तारित होत गेले, आपापल्या गरजेप्रमाणे मागण्यांची यादी जरी वाढत गेली, तरी समाजहित हीच अंतिम तळमळ होती याबद्दलही कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. पुढे नागपूर मोर्चा, मुंबई मोर्चा आणि चक्काजाम अशा निर्णयाबाबत पहिल्यांदा विभिन्न मते समोर आली हेही आपण बघितले आहे.

वर वर विचार करणार्‍या लोकांना कोणत्याही गोष्टीची घाई असते, लाखो लोक एकत्र येतात आणि तरीही सरकार पडत नाही म्हणजे काय? असा भाबडा प्रश्‍न त्यांना सतत पडत असतो, याहीवेळी तो पडला. यादरम्यान नगरपालिकांच्या निवडणूक झाल्या आणि कथित राजकीय विश्‍लेषकांनी त्याही निकालात मराठा मोर्चाचा परिणाम शोधायला हातात भिंग घेऊन सुरुवात केली. मोर्चाचा काहीही परिणाम झाला नाही, असा निष्कर्ष काढून हे तज्ज्ञ लुप्त झाले. आता महापालिका आणि जिल्हा परिषद निकाल आल्यावर पुन्हा आपला भिंग साफ करून मराठा मोर्चाचा परिणाम शोधायला सुरुवात केली आहे. या सगळ्या खेळीला अनेक मराठा विचारवंत, कार्यकर्ते नाहक बळी पडल्याचे दिसत आहे. अशा लोकांच्या सुरात सूर मिसळून मराठा पराभूत झाल्याची उगाच हाकाटी पिटून काही लोक उर बडवून घेत आहेत. हे ताजे निकाल हाती आल्याबरोबर पहिली प्रतिक्रिया आली तीच मुळात कुणाची होती हे लक्षात न घेतल्यामुळे सगळा घोळ झाला.

गावगाड्यात विखुरलेला मराठा, राजकारणाला अंतिम प्राधान्य देणारा मराठा आणि अठरापगड जातींना घेऊन चालणारा मराठा, त्याच्या राजकीय अपरिहार्यता यांचा बर्‍यापैकी अभ्यास ज्याला असेल तो या निकालांचा आणि मोर्चाचा कधीही संबंध जोडण्याच्या भानगडीत पडणार नाही. चक्काजामनंतर एक विचार प्रवाह असा नक्कीच आला की, आता भाजपशी असहकार करायला हवा, नंतर सकल मराठा समाजाच्या औरंगाबाद बैठकीत भाजपला मतदान करू नका, असाही निर्णय झाला पण तो बहुमताने होता एक मताने नव्हता. कारण हे प्रत्यक्षात शक्य होणार नाही याची मांडणीसुद्धा अगोदरच्या दोन बैठकीत झाली होती पण काही लोकांच्या फाजील आत्मविश्वासापोटी असे निर्णय वाद टाळण्यासाठी घेतले जात असतात हेही लक्षात घेतले पाहिजे. काही प्रामाणिक, भाबडे लोक कारण नसताना प्रचंड निराश झाले आहेत , कारण त्यांनी या काळात समाजाच्या ऐक्यासाठी ढोर मेहनत घेतली आहे.

हे लक्षात घ्या की महापालिका किंवा जिल्हा परिषदा यांच्यात ज्यांचा जीव अडकला आहे असे मराठे या पासून अलिप्त राहणे कसे शक्य आहे? ज्यांच्या 2/2 टर्म पराभवाने व्यर्थ गेल्या आहेत अशांनी ही संधी पण वाया घालवावी यात शहाणपणा समाजाला नाही, ते सगळे नव्या जोमाने कमला भिडले, त्यांच्यामागे भावकी पण भिडली आणि निकाल पुढे आले. आता यात मराठा मोर्चाचा परिणाम कितपत झाला हे शोधणे नक्कीच कोणत्याही अंगाने संयुक्तिक होत नाही हे निराशेच्या गर्तेत फेकल्या गेलेल्या मराठा तरुणांनी समजून घेतले पाहिजे. एखाद्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी विशाल आणि जन्मजात नेत्यांच्या समूहात शक्य नसते. ज्या समूहाचा आजवर कुणीही एक नेता सर्वमान्य होऊ शकला नाही. त्यांच्यात असे राजकीय निर्णय अशक्य असतात हे साधे गणित मराठा संघटना चालवणार्‍यांना कळत नसेल तर आपण व्यूहरचनेत कमी पडत आहोत हे तरी कबुल केले पाहिजे.

मराठा मोर्चा नाटक होते, सामाजिक ऐक्य सब झुट्या बाता आहेत, एक मराठा – लाख मराठा नव्हे, एक मराठा – एकच मराठा, आता ताकद दाखवणे बंद करा, मोर्चाचे पुन्हा नाव काढू नका, अशा निराशेचे भयंकर फुत्कार सोशल मीडियावर गेली 3 दिवस सुरू आहेत. ज्यांना मराठ्यांची सावली जरी अंगावर पडली तरी मिरगी येते अशा प्रवृत्ती याचा आसुरी आनंद घेत आहेत. याच काळात मराठा-दलित, मराठा-ओबीसी अशा झुंजी लावण्यात जे थोडेफार यशस्वी झालेत त्याच प्रवृत्ती मराठा मोर्चाचा परिणाम शोधायला उतावीळ झाले आहेत, इतर फक्त त्यांना फॉलो करताना दिसत आहेत. लक्षात घ्या एका महापूजेने देव म्हातारा होत नाही. त्याला अनेक संयुक्तिक कारणांनी सतत पूजा घालाव्याच लागत असतात. मराठा मोर्चामुळे दिसणारे आणि न दिसणारे फायदे खूप आहेत पण आपण नकारात्मक झालो आहोत, पी हळद अन् हो गोरी याचा तत्काळ परिणाम बघायची आम्हाला घाई झाली आहे. सत्ता जिंकली, मराठा हरला हे अर्धसत्य आपण आणखी किती दिवस आपल्याच समूहाला सांगून भ्रमात ठेवणार आहोत? अरे उठा .. अन् नव्या दमाने जगाला कृतीतून दाखवून द्या की मोर्चाचा विचार प्रवाह मरणार नाही!

– पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248
(लेखक दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)