मराठा वारी : लाखोंचा संयमी जनसागर

0

9 ऑगसटचा मुंबई क्रांती मोर्चा आपल्याला जायलाच हवे…औरंगाबादच्या पहिल्या मराठा क्रांती मोर्चानंतर जळगावमध्ये दुसरा मोर्चा निघाला. त्याच्या संयोजनात मोठ्या हिरहीरीने सहभाग घेतला होता, पण त्यानंतर एवढे लाखोंचे पन्नासावर मोर्चे निघाले…पण सरकार मात्र ढिम्म, एक वर्ष उलटले तरी कोपरडीच्या चिमुरडीला चिरडणार्‍यांना लवकर फाशी होईल याची शक्यता नाही, मन काहीसे उदास होते, संध्याकाळीच 7 वाजता मी व मावसभाऊ संजय साळुंखे रेल्वेेने निघालो, जळगावच्या आमच्यापैकी काही संयोजकामध्ये सामिल मंडळी एव्हाना मुंबईत पोहोचली होती. एवढे 57 मोर्चे झालेत, स्वत:चा वेळ आणि पदरचा पैसा खरच करुन किती संख्येने लोक येतील याबाबत मन साशंक होते…स्टेशनवरच काही मंडळी भेटली, थोड बरे वाटले, आपल्याकडची बरीचशी मंडळी नंतरचे रेल्वेने येईल, अशी चर्चा झाली. उद्याचा दिवशी काय होणार, याचा विचार करत डोळा लागला…मनमाड स्टेशनवर अचानक आवाजाने खडबडून ऊठलो, एक मराठा…लाख मराठा, ताबडतोब गाडीच्या दारातून डोकावलो, भगवे झेंडे खांद्यावर घेऊन मराठा क्रांती मोर्चा, जगदंब, जय शिवराय असे विविध वाक्य लिहीलेले काळे शर्ट घातलेली तरुण मंडळी मोठ्या संख्येने रेल्वे फलाटावर मोर्चात सहभागी होण्यास सज्ज होती…माझ्या मनात प्रचंड उत्साह संचारला, मी देखील फ्लॅटफार्मवर उतरलो व त्यांच्या सुरातसूर मिळवला, तुमचे आमच नात काय, जय जिजाऊ जय शिवराय.

नंतर झोप लागण्याचा प्रश्न नव्हता, नाशिक, ईगतपुरी येथूनही प्रचंड गर्दी गाडीत चढली …मी त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून व्हाटस अप ग्रुपवर टाकत राहिलो, आतुरतेने पुढील स्टेशनची वाट बघत राहिलो, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मराठे येणार अशी खात्री वाटायला लागली होती. ईगतपुरीनंतर पहाटे 1-2 वाजताच्या सुमारास आमच्या एसी डब्यातही दरवाज्याजवळ 25-30 तरुण दाटीवाटीने ऊभे राहिलेले मला दिसले. अस्ताविकपणे त्यांची चौकशी केली ते सर्व ईगतपुरीच्या आसपासचे ग्रामीण भागातून आलेले 18-20 वर्ष वयोगटातील मुल होते, खांद्यावर लटकवलेली बॅग, त्यात पाण्याची बाटली, सकाळची न्याहरी एवढच काय ते सामान, त्यांना मी ‘एसी डब्यात बसा जागा आहे आत या थोड अ‍ॅटजेसट करु’ असे सांगितले तर ते म्हणतात, नको काका कशाला ऊगा कोणाला त्रास आणि असेही आम्ही कुठे एसीत राहतो? त्याच्या या उत्तराने मन हेलावले… त्यांना सहज विचारले, समजा आपल्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर काय करायचे? सगळ्यांचा एकच सूर होता ‘आता बास झाले मुक मोर्चा आता ठोक मोर्चा झाला पाहिजे, आम्ही मागणया मान्य होईस्तोवर हलायच नाही असं ठरवून आलोय’. पहाटे चार वाजता गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली आणि जिकडे तिकडे भगवे झेंडे, सळसळता उत्साह, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय रहाणार नाही, अशा एक ना दोन अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेलेला. मोठ्या खुशीत जवळच्याच लॉजवर गेलो, तेथे अगोदर बुकिंग सांगितलेले म्हणून 15 मिनिटांनी गेट उघडले, लॉजमध्येही मोर्चेकर्‍यांची प्रचंड गर्दी होती जिकडे जागा मिळाली तिकडे पोहोचलो, तिथेही सोलापूरकडची 7-8 मुले 5 वाजताच उठून तयारी करीत होती, एवढ्या लवकर कुठ, मोर्चा 10.30 ला निघणार आहे ना? असे विचारल असता, ते म्हणाले आमच्याकडे स्वयंसेवकाची जबाबदारी आहे, आम्ही लवकर निघायला हवे. 7.30 वाजेपर्यंत लॉजच्या खिडकीतून सीएसटीएम स्टेशनमधून येणारे भगवे जत्थे मी मोजत होतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपरातून आणखी किती लोक वाहनांनी व इतर साधनांनी येतील याचा अंदाज येत नव्हता. एव्हाना सीएसटीएम चौकातही भरपूर भगवी गर्दी वाढायला लागली होती.

8.30 वाजता खाली उतरलो, संपूर्ण परिसरात प्रत्येक हॉटेलवर गर्दी होती. आम्ही मागच्या गल्लीत नाश्ता करण्यासाठी गेलो, तिथे डॉक्टरसाहेब असा सुपरिचित आवाज आला, आमचे आडगाव, तालुका एरंडोल येथील मामेभाऊ 7-8 कार्यकर्त्यांसह थेट जिपगाडीने हजर. ते पहाटे 6 वाजताच पोहोचले होते. 20 मिनिटांच्या वेटींगनंतर आम्हाला 2 वडा पाव मिळाले ते खाऊन आम्ही जवळच्याच कॅपिटल हॉटेलकडे आलो जिथे 1 दिवसापूर्वीच जळगावची मंडळी थांबलेली होती.

मग सगळे एकत्रितपणे मराठा क्रांती मोर्चा, जळगांव जिल्हा, असा भव्य बॅनर भगवे झेंडे घेऊन बृहन्मुुंबई महापालिकेचा समोर येऊन थांबलो, बॅनरमुळे जळगांव जिल्ह्यातील बरीचशी मंडळी आपसूकच आजुबाजूस गोळा झाली. साधारणत: 11 वाजताच्या सुमारास मोर्चा निघाला, अशी घोषणा झाली आणि आम्ही आझाद मैदानावर प्रचंड गर्दीत सामिल झालो व मोर्चाची वाट पाहु लागलो. आजुबाजुची गर्दी बघूनच मोर्चा भव्य दिव्य असणार याचा अंदाज येत होता.

आझाद मैदानानंतर तब्बल 5 तासाचा वेळ, मंचावरील मुलींचे त्वेषपूर्ण भाषणे ऐकता ऐकता वेळ कसा निघून गेला कळालेदेखील नाही, यादरम्यान जिल्ह्यातील बरीचशी मंडळी भेटली, मोबाईल नेटवर्क जाम असल्याने एकदा चुकामूक झाली की परत तो व्यक्ती सापडत नव्हता एवढा प्रचंड जनसागर याची देही याची डोळा पाहायला मिळाला. यावेळेस एक फरक मात्र प्रामुख्याने जाणवला, मुक मोर्चा तेवढा मुक जाणवत नव्हता, धगधगत्या निखार्‍याप्रमाणे कधीही पेटेल असे सारखे वाटत होते…दुपारी 4 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांकडेे गेलेल्या मुलींच्या शिष्टमंडळाने सकारात्मक निर्णयाचा निरोप आणला आणि जीव भांड्यात पडला…12-24 तासांचा हालअपेषटा सहन करुन आलेला, सकाळपासूनच ऊन -पावसात 6-7 तास अर्ध भुकेलेला संतप्त पण तरीही शांत बसलेलया ह्या जवळपास 25-30 लाखांच्यावरील जन महासागरात त्सुुनामी आली तर काय अनर्थ घडेल याची भिती माझ्या मनात दुपारपासून घर करुन राहिली होती. पण आई भवानीचे कृपेने राज्यकर्त्यांना उशीराने का होईना पण जाग आली व चांगला निरोप कानी आला.

पुन्हा संध्याकाळी 7 वाजताच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघालो…परमेश्वर सरकारला सुबुद्धी देवो व निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर होवो…माझ्या 70 टक्के साधारण, मध्यम वर्गीय व गरीब अशा या समाजबांधवांवर पुन्हा एकदा मोर्चा काढणयाची वेळ न येवो हा विचार रात्री 2 वाजता जळगाव येईपर्यंत मनात घोंघावत होता, व्हाटस अ‍ॅपवर नेहमीप्रमाणे फोटो, सेल्फी, उलट सुलट चर्चा सुरुच होत्या…पण दुर्दैवाने जर तशी वेळ आलीच तर मात्र मोर्चा मुक आणि शांत ठेवणे कस शक्य होईल, काय होईल हा विचार करत घरी पोहोचलो.

– डॉ. राजेश पाटील
एम डी, बालरोगतज्ञ सचिव,
आयएमए, जळगाव
अध्यक्ष , बालरोगतज्ञ संघटना , जळगाव
माजी ऊप प्रांतपाल , रोटरी 3030