मराठा समाजाचा ‘चक्का जाम’ आंदोलन

0

जळगाव । सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी मंगळवार 31 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान ‘चक्का जाम’ आंदोलन शहरातील आकाशवाणी चौकात करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाज संघटना, छावा संघटना व काँग्रेस यांचा सहभाग होता. चौकात आंदोलन होणार आहे या नुसार पोलिस यंत्रणासह ताफा नियंत्रणासाठी सज्ज होती. ‘चक्का जाम’ आंदोलन जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत प्रांतधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाचे आत्तापर्यंत महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने मुकमोर्चा द्वारे लाखोंच्या संख्येने मोर्चारूपी आंदोलन करण्यात आले होते. मुकमोर्चा हे संयम व शांततेच्या मार्गानेे जे आंदोलन झाले त्याची दखल शासनाने घेतली नसल्यामुळे मराठा समाजातर्फे त्यांच्या हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी 31 रोजी जिल्ह्यात तालुकापातळीवरही आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. चाळीसगाव येथे खडकी बायपास वर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जवळपास 2 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अमळनेरात बोरी नदीवरील फरशी पुलावर आंदोलन केले, चोपडा येथील धरणगाव नाक्यावर तालुक्यातुन मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र येवून समाजाच्या मागण्या केल्या. नगरदेवळा स्टेशन येथील उड्डाणपुलाजवळ मोठ्या प्रमाणात चक्का जाम करण्यात आले.

समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
आकाशवाणी चौकात झालेल्या मराठा समाज मोर्चात भिमराव मराठे, विकास पवार, बाळासाहेब सुर्यवंशी, संतोष पाटील, केतन पाटील, कृष्णा पाटील, मालोजीराव पाटील, जयेश पाटील, सागर पाटील, हितेश कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, लबाड सरकारचे करायचे काय खाली डोकं वरती पाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आवाज कुणाचा मराठ्यांचा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

मराठा समाजाच्या विविध मागण्या
सकल मराठा समाजाला लोकसंख्या व घटनेतील अधिकारी प्रमाणे शासनाने लागू केलेले राणेे समितीच्या शिफरशीनुसार 16 टक्के आरक्षण तात्काळ मराठा आरक्षण द्यावे, नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटना अद्यापही फास्ट ट्रॅक कोर्टात चालत नाही. ह्या घटनेतील आरोपीला तात्काळा शिक्षेसाठी शासनाने नेमून दिलेल्या वकीलांनी हालचाल करावी, शेतकर्‍यांसाठी तात्काळ स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, जिल्ह्याजिल्ह्यात अल्पभूधारक शेतकर्‍यासही शासनाच्या वतीने वसतीगृहे सुरू करावी यासह आदी मागण्यांसाठी आजच्या आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहचवावे.

पोलिसांच्या चोख बंदोबस्त
आज सकाळी झालेल्या मराठा आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार व हिंसा होवू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तालुका पोलिस स्टेशन व रामानंद पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी आंदोलनास्थळी जवळपास 40 ते 50 जणांना अटक करून सुटका करण्यात आली. यावेळी आंदोलन सुरू होताच पोलिसांनी इच्छादेवीपासून वाहने वळविण्यात आले होती. तरी बराच वेळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा प्रसंगी निर्धार करण्यात आला. आंदोलनस्थळी रुग्णवाहिका, अग्निशमन बंब तसेच क्रेन तैनात ठेवण्यात आली होती.