मराठा समाजाची 7 एप्रिलला कोल्हापुरात गोलमेज परिषद

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – सरकारच्या डोळ्यावरचे झापड उघडण्यासाठी व मराठा आरक्षण संघर्ष समितीची पुढची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूरात 7 एप्रिलला गोलमेज परिषद आयोजित केली आहे. यामध्ये राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटना, संस्था, मुख्य माध्यम प्रतिनिधी, इतिहास संशोधक, मार्गदर्शक यांचा सहभाग असेल, अशी माहिती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी पिंपरी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. मधूकर पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील, कोकण विभाग अध्यक्ष विलास सांवत, मराठा युवा अध्यक्ष रविंद्र खोत, ठाणे विभाग अध्यक्ष अविनाश पवार, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, मराठा युवा संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, मराठवाडा युवा अध्यक्ष दत्ता मोरे आदी उपस्थित होते.

सर्व जीआर बोगस
पाटील म्हणाले, ‘यापूर्वी काढलेल्या मोर्चातून समाजाने प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे राज्यभर मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच 9 ऑगस्ट मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदारांच्या माध्यमातून निवेदन दिले होते. या सर्व निवेदनामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांचा उल्लेख केलेला आहे. मराठा समाजाला पुढे करुन काढलेल्या सर्व जीआरमध्ये एकाही ठिकाणी ‘मराठा समाज’ अशी नोंद नाही हे सर्व जीआर आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गांसाठी आहे. प्रत्येक जीआरमध्ये सरकारने व त्यांच्या अधिकार्‍यांनी अनावश्यक अटी टाकून या जीआरचा व महामंडळांच्या सवलतीचा लाभ मराठा समाजाच्या युवकांना कसा घेता येणार नाही याची मात्र काटेकोरपणे दक्षता घेतली आहे’.

या शैक्षणिक वर्षापासून लाभ मिळावेत
मराठा आरक्षण संघर्ष समितीची प्रमुख मागणी अशी आहे की, चालू शैक्षणिक (2017-18) वर्षापासूनच मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच सरकारी नोकरीमध्ये इबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची अद्यापर्यंत नेमणुक झालेली नाही ती ताबडतोब करावी.