बेळगाव : न्याय-हक्कासाठी आवाज उठवण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे गुरुवारी लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपर्यासह महाराष्ट्र, गोवा येथून लाखोंचा जनसागर बेळगावमध्ये धडकला. इतिहासात मराठ्यांच्या पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला. प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने जाचक अटी घालून परवानगी देऊनसुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा व मराठी बांधव-भगिनी सहभागी झाल्या. मोर्चात सुमारे दहा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी झाल्याचा दावा मोर्चाच्या संयोजकांनी केला.
आचारसंहितेचे पालन करत मोर्चा यशस्वी
गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून बेळगांवमध्ये मराठा बांधव येऊ लागले. काही वेळातच शहरातील विविध मार्ग गर्दीने फुलून गेले. मोर्चा सुरू होणार्या शिवाजी उद्यान याठिकाणाच्या दिशेने महिला, पुरूष, युवक-युवतींचे जथ्थेच्या जथ्थे येत होते. यातील बहुतांश जणांच्या हातात भगवा ध्वज, विविध मागण्यांचे फलक, डोक्यावर ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मी मराठा’ असा उल्लेख असलेली भगवी टोपी, गळ्यात स्कार्फ आणि अंगात काळे टी-शर्ट होते. महिलांनी भगव्या साड्या नेसल्या होत्या. सकाळी नऊला शिवाजी उद्यानाचा परिसर गर्दीने खचाखच भरुन गेला. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मथुरा कुंडेकर, प्रांजल धामणेकर, सलोनी पाटील, गौतमी उगाडे आणि वैष्णवी कडोलकर या रणरागिणींच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करून प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरूष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. रखरखत्या उन्हाचा तडाखा बसत असतानादेखील मोर्चात सहभागी होणार्यांची संख्या वाढतच गेली होती.
बेळगाव भगवेमय
मोर्चा मार्गावरील विविध गल्लीमधील महिला-पुरूष या जनसागरात सहभागी होत होते. मोर्चातील प्रत्येकाच्या चेहर्यावर मराठी अस्मिता आणि मागण्यांच्या पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा पक्का निर्धार स्पष्टपणे दिसत होता. हवेत भिरभिरणारे भगवे ध्वज, डोक्यांवरील टोप्या आदींमुळे अवघ्या शहरात भगवे वादळ निर्माण झाले होते. कपिलेश्वर मंदिर, शिवराय उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्र प्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजीचौकात मोर्चा पोहोचला. याठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मोर्चा संपला तरी अनेक बांधव, भागिनी शहरात दाखल होत होते.