हडपसर । चारशे वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असणारा मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे, तरी समाजाच्या तरुणांनी प्रस्थापित राजकारण्यांच्या मागे जाऊन आपले भवितव्य पणाला लावण्यापेक्षा शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या जोरावर नव-नवीन उद्योग-व्यवसायांमध्ये आपले करिअर घडवावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.
मराठवाडा बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थापक महेश टेळेपाटील, संतोष सुरते, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, तानाजी केकाण, सुनील पाटील, विश्वास पटाडे, अनिल मोरे, सुनील साळवी, रमजान शेख, राहुल जाधव, अनंत बोराटे, अनिल बोटे, कमलेश जगताप आदी उपस्थित होते.
जानकर म्हणाले, मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असतानाही समाजाने अठरापगड जातींना आपल्यासमवेत न्याय देण्याचे काम केले तेच आज न्यायाच्या हक्कासाठी लढताना दिसत आहेत. सर्वसामान्य शेतकरी हा मराठा असल्यामुळे आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी अनेक नवीन योजनांची अमंलबजावणी शासनाद्वारे करण्यात येत आहे. तरुणांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यासाठी वेळ न घालवता बुट पॉलिशपासून डोक्याच्या मालिशपर्यंत कुठलाही उद्योग व्यवसाय करावा.