मुंबई: सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. २०२०-२१ या वर्षात एसईबीसीसाठी लागू असलेले आरक्षण मराठा समाजाला लागू करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. हा राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्य सरकारने योग्य बाजी मांडली नाही, त्यामुळे आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाली. यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी यावर भाष्य केले आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. काही लोकांकडून गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे, कृपया गैरसमज करून घेऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला केले आहे.
राज्य सरकार आपली बाजू कोर्टात योग्य रीतीने मांडत आहे. मात्र तरीही कोर्टात आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. ही न्यायलयीन लढाई असून ती लढण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. लवकरच समाजाला न्याय देऊ असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात राजकारण आणले जाणार नाही असा शब्द दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.