मुंबई – राज्यातील मराठा समाजासाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघांत तातडीने मदतकेंद्रे सुरू करतील, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी दिली. दादरच्या वसंतस्मृती, या भाजपाच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर बैठकीतील माहिती देताना तावडे बोलत होते. मराठा समाजाला भाजपा सरकारच आरक्षण देईल. यापूर्वीच्या सरकारनी काहीही केले नाही. न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्यासाठी राज्य मागसवर्ग आयोगाकडून कालबद्ध पद्धतीने अहवाल घेण्यात येत आहे.
हे देखील वाचा
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या हितासाठी उचललेल्या सर्व पावलांची माहिती या बैठकीत दिली. मराठा समाजाच्या तरूणांना बँकांकडून बिनातारण, बिनव्याजी दहा साख रूपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेशशुल्कात प्रवेश देण्याची योजना आहे. या तसेच इतर योजनांमधून लाभ घेण्यात कोणाला अडचण येत असताना त्यांना योग्य ती मदत मिळावी म्हणून भाजपाचे आमदार आपापल्या मतदारसंघांमध्ये मदतकेंद्रे सुरू करतील, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या आंदोलकांनी हिंसेचा मार्ग सोडावा तसेच आत्महत्त्या करेपर्यंतचे टोकाचे पाऊल उचलू नये. भाजपा मराठा समाजासोबतच आहे, असेही तावडे म्हणाले.