घोषणांनी नाहाटा महाविद्यालय परीसर दणाणला : आंदोलक ताब्यात
भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यालयाजवळ सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करीत समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. दोन प्रतिनिधींनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
यांचा आंदोलनात सहभाग
मराठा समाजाचे शहराध्यक्ष महेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, आनंद ठाकरे, रवींद्र लेकुरवाळे, सुनील पाटील, प्रमोद पाटील, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, संजय शिंदे, राजेश देवपूजे, ईश्वर पवार, प्रवीण पाटील, किरण पाटील, कृष्णा शिंदे, नरेश पाटील, संजय कदम, विनोद पवार, गजानन पवार, पिंटू भनगडे, सचिन हिंगणे, संजय जाधव, चंदू जाधव, सुधाकर निकम, हितेश टकले, आप्पा ठाकरे, प्रशांत साळुंखे, रवी ढगे, बाळू गरूड, सुनील पाटील, सचिन पाटील, विजय पाटील, आकाश शिंदे, पिंटू इथापे, रजेश शिंदे व मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखला. आंदोलकांची लागलीच जामिनावर सुटका करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळ बंदला संमिश्र प्रतिसाद
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी भुसावळ बंदची हाक देण्यात आली होती मात्र शहरातील वर्दळीच्या भागात काही व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले तर काहींनी मात्र नियमितरीत्या दुकाने उघडली. शहरात जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे. शहरातील अनेक शाळांमध्ये सकाळी विद्यार्थी पोहोचले मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही वेळात शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.