भुसावळ। कोपर्डी हत्याकांड प्रकरणाला वर्ष पुर्ण झाले असून अजूनही गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. हा खटला अद्याप न्यायालयात सुरु आहे. या तसेच अमरनाथ येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निरपराध भाविकांना आपले प्राण गमवावे लागले असून या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे महात्मा गांधी पुतळ्यासमोर गुरुवार 13 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. तसेच कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
एकत्रितपणे लढा देणार
गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोपर्डी हत्याकांड झाले होते. तरुणीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात न्यायालयात कामकाज सुरु आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज एकवटून भव्य मोर्चे काढण्यात आल्याने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्यामुळे मराठा समाजातर्फे एकत्रितपणे लढा देण्याची तयारी केली जात असून यातील गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा करण्यात येण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी यावेळी केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, प्रदीप देशमुख, कृष्णा शिंदे, संजय कदम, ईश्वर पवार, नरेंद्र पाटील, बापू पाटील, महेंद्र ठाकरे, नरेश पाटील, ललित मराठे, हरिष पाटील, प्रसन्न धुमाळ, गोपाळ राऊत, हिरामण पाटील, धीरज वाहुळकर, फारुक गवळी, अभिजीत मराठे, सुरेश पाटील, संजय पाटील आदी समाजबांधव हजर होते.