जेजुरी । मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरीची आवश्यकता आहे. मन की बात करणार्यांकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचे काम करवून घेण्यासाठी मनसे प्रयत्न करा, असे अवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले.
राज ठाकरे यांच्याशी चर्चा
कवी सुधांशु जन्मशताब्दी आणि अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या समारोपासाठी राज ठाकरे औदुंबर येथे आले होते. कवी सुधांशु यांच्या घरी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी राज ठाकरे बरोबर झालेल्या चर्चेत आणि समारोपाच्या कार्यक्रमात जाहीरपणे हे अवाहन केले. सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. प्रा. जोशी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीने सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी परिषदेने केलेल्या प्रयत्नांची माहिती ठाकरे यांना दिली.
मराठी जनतेच्या अस्मितेचा विषय
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे महत्वाचे असून हा अकरा कोटी मराठी जनतेच्या अस्मितेचा विषय आहे असे प्रा. जोशी यांनी सांगितले त्यावर आपण सर्वजण मिळून यासाठी प्रयत्न करूया असे राज ठाकरे यांनी सांगितले. मी स्वतः मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दहा वर्षांपूर्वीच पत्र पाठविले आहे, पण कसलाही प्रतिसाद नाही. मराठीच्या अगोदर गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल तो ही अर्ज न करता अशी कोपरखळी ठाकरे यांनी मारली.