मराठीच्या समृध्दीसाठी तंत्रज्ञान, सामूहिक प्रयत्न आवश्यक

0

पुणे । मराठी भाषेची व्याप्ती वाढविण्याासाठी तसेच तिचा प्रसार व प्रचार होऊन ती संपन्न करण्यासाठी मराठी लेखक, वाचक, प्रकाशक, ग्रंथालये, मराठी साहित्य परिषदा यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत संगणक तज्ञ व संगणक साक्षरतेसाठी मराठी भाषेतून लिखाण करणारे डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. ते 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि मित्र परिवाराने मराठी साहित्य परिषद येथे आयोजित केलेल्या ई-मराठी व साहित्य या विषयावरील परिसंवादाच्या वेळी बोलत होते.

मिशनरींप्रमाणे भाषाप्रचाराचे काम करा
डॉ. दिपक शिकारपूर म्हणाले, मराठी साहित्य परिषदेने पाचशे वाक्यांचे छोटे अ‍ॅप तयार करावे. या मुळे अ‍ॅप निमिर्तीमध्ये करिअरसंधी वाढून अमराठी लोकांसाठी त्याचा फार उपयोग होइल. भविष्यात त्याचा उपयोग मराठी वाचक वाढविण्यास तसेच पुस्तकाची बाजारपेठ वाढविण्यास होईल. अमराठी लोकांसाठी मराठी साहित्य संमेलन भरविणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे भाषांतरीत पुस्तके जगभर पोहचत आहेत. लेखकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान युक्त अशी कार्यशाळा घेणे आता आवश्यक झाले आहे. मराठी भाषेचा प्रचार जगभर करण्यासाठी मिशनरी लोकांप्रमाणे भाषाप्रचाराचे काम सर्वांनी करावे. संगणक तज्ञ व लेखक दिपक शिकारपूर यांच्यासह एमकेसीएलचे उदय पांचपोर, डेलीहंटचे संचालक महेंद्र मुंजाळ, मॅग्नम ओपसचे संचालक गिरिश लाड, स्ट्रटेजिक फोरसाईट ग्रुपचे सचिन ईटकर, कुलभूषण बिरनाळे, मीडियाक्युरा इन्फोलाईनचे संतोष देशपांडे व प्रसिध्द साहित्यिक, पुस्तक पेठे प्रणेते संजय भास्कर जोशी यांनी भाग घेतला.

विविध विषयांवर रंगला परिसंवाद
अनेक माध्यमांचा एकत्र विचार केल्यास लोक ज्ञानी होतील. मराठी फॅान्टसमध्ये विविधता असल्याने त्यात सुसुत्रीकरण आवश्यक, मराठी भाषेच्या विकासासाठी ऑन लाइन कोर्सेस, मराठी भाषेसाठी विकिपडियामध्ये चळवळ करणे, सरकार आणि उद्योजकाकडून अनुदान, महाराष्ट्रातील ग्रंथालयातील जुन्या हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन, मराठी पुस्तके अनुवादित करण्यासाठी सरकारी अगर खाजगी अनुदाने, सर्जनशील लेखनासाठी सामाजिक संमेलने, इ-ग्रंथालये इत्यादी विषयावर या परिसंवादात चर्चा रंगली. साहित्य संमेलनाचेे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.