मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या!

0

मसाप पिंपरी-चिंचवड शाखेचे खा. बारणेंना निवेदन

पिंपरी-चिंचवड : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. याबाबत येत्या अधिवेशनात लोकसभेत आवाज उठवणार असल्याचे आश्‍वासन खा. बारणे यांनी दिले. मसाप पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने मागील वर्षी मराठी भाषेच्या प्रश्‍नाबाबत मराठी अभ्यासकांची बैठक घेण्यात आली. तसेच शहरातील साहित्यिक व मराठी भाषिक यांच्या सह्या असलेले निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 17 एप्रिल 2017 रोजी पाठविले. नागरिकांची 10 हजार पत्रेही पाठविण्यात आली. तरीही अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे लाखे यांनी सांगितले.

अधिवेशनात मुद्दा मांडणार : खा. बारणे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने रंगनाथ पठारे समितीची नेमणूक केली. या समितीने अहवाल सादर करून अभिजात दर्जा देण्यासाठी शिफारस केली होती. परंतु, राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे हा प्रश्‍न प्रलंबित राहिला आहे. यासंदर्भात खासदार बारणे यांनी मराठी भाषेचा प्रश्‍न यापूर्वी दोनदा उपस्थित केला होता. या रखडलेल्या प्रश्‍नाला गती मिळावी, म्हणून मसापचे शहराध्यक्ष राजन लाखे यांनी खासदार बारणे यांना शासनाने आधी पाठविलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. तसेच हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी केली. त्यानुसार खासदार बारणे यांनी येत्या संसदेच्या अधिवेशनात ही मागणी लावून धरणार असल्याचे मसापच्या पदाधिकार्‍यांना आश्‍वासन दिले.