मराठीसाठी पश्‍चिम रेल्वेचे एक पाउल पुढे

0

मुंबई : मुंबई व पश्‍चिम उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या मराठी नावांची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांकडून मागितली आहे. काही रेल्वे स्थानकांचा अमराठी भाषेतून अपभ्रंश व चुकीचा उल्लेख होत असल्याच्या तक्रारी व आंदोलने होत असल्याने रेल्वे प्रशासनानेदेखील याबाबत आता सकारात्मक पाऊल उचलले आहे.

भाईंदर स्थानकाचा हिंदी व इंग्रजीतून भायंदर असा सर्रास अपभ्रंश केला जात आहे. शिवाय मराठीतूनसुध्दा भायंदर असे लिहिले जात होते. मध्यंतरी तर गुजराती भाषेतली भाईंदर अशी पाटीही या स्थानकात लावण्यात आली होती. महसुली नोंदी भाईंदर असे नाव असताना त्याचा हिंदी वा इंग्रजीतूनपण भाईंदर असाच उल्लेख व्हायला पाहिजे अशी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना, मनसे या पक्षांची मागणी होती. पालिका महासभेतदेखील याबाबत ठराव करण्यात आला. परंतु या राजकिय पक्षांनीनंतर याचा पाठपुरावा केला नाही.

दरम्यान मराठी एकीकरण समितीने भाईंदरसह वांद्रे, परळ अशी मराठमोळी गावांची नावे असताना त्याचा हिंदी, इंग्रजीतून होणारा अपभ्रंश रोखण्यची मागणी मुख्यमंत्र्यांसह रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्याचसोबत आरक्षण अर्ज, इतर अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करावेत, तिकीटे व पास मराठी भाषेतून द्यावेत, सर्व उद्घोषणा, सर्व माहिती फलक व जनजागृती फलक/पत्रकांमध्ये राज्याची राजभाषा म्हणून मराठीला प्राधान्य देण्याची मागणीही करण्यात येत होती. तसेच आता रेल्वे वर्कस् मॅन्युअलमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा आग्रह समितीने धरला आहे. त्यासाठी समितीने उपोषण, धरणे आंदोलन, स्वाक्षरी मोहिम तसेच निषेध आंदोलने केली.

अखेर पश्‍चिम रेल्वेनेसुध्दा ही बाब गांभीर्याने घेत रेल्वे स्थानकांच्या नावांमध्ये असणारा मराठीचा अपभ्रंश थांबवण्यासाठी सकारात्मक पाऊाल उचलले आहे. पश्‍चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी तर मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून त्यांच्या हद्दीत येणार्‍या रेल्वे स्थानकांची मूळ महसुली नोंदी असलेली मराठीतली नावे व त्याचे शब्दलेखन मागवले आहे. रेल्वे स्थानकांच्या नावांचा चुकीचा उल्लेख होत असल्याबद्दल प्रवाशी व अन्य संस्थांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. रेल्वे स्थानकांच्या नावांची मंजुरी राज्य शासनाकडून होत असते. त्यामुळे महसुली नोंदी असलेली नावे व शब्दलेखन अधिकृतरित्या उपल्बध्द करून द्यावे जेणेकरून नावात सुधारणा करायची गरज असल्यास ती करता येणार आहे, असेही रेल्वेने म्हटले आहे.