मुंबई (निलेश झालटे):– मोठमोठाले रथ, पुतळे वगैरे आणून मराठी भाषा दिनी मराठीचा सोहळा अगदीच थाटामाटात पार पडला. भलेही मराठी अभिमान गीत गाताना लाऊडस्पीकरचा प्रॉब्लेम झाल्याने अभिमान मुका झाला आणि गोंधळ उडाला. कसबस सावरून घेतलं पण मराठीचा हा सातत्याने होणारा अपमान काही विरोधकांना सहन होईनाय. सत्ताधारी भाजप आणि विशेष म्हणजे तुरळक वगळता शिवसेना हा अपमान सहन करतेय हे मात्र विशेष. असो, अशा काही अनपेक्षित घटना घडल्याने भाषेचा अपमान वगैरे होतो ही अंधश्रद्धा असते म्हणा. त्यामुळे भाषेचं नाक वगैरे कापले जाईल असेही आजिबात नाही. मात्र प्रश्न उरतो हा की अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मराठी भाषेचा अवमान झाल्याच्या आरोप करत विरोधकांनी रान पेटवले असताना मराठीच्या नावाने गळे काढणाऱ्या शिवसेनेकडून मात्र चुप्पी का साधली जात आहे. विरोधकांकडून सत्तेपायी लाचार असल्याचा आरोप खरंतर नाही. खरोखर महाराष्ट्रात शिवसेना म्हटले की मराठी बांधव, मराठी भाषा हे आपुलकीचे विषय. राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न झाल्यामुळे विरोधी पक्ष एकीकडे आक्रमक झाला असताना दुसरीकडे मराठीच्या नावावर गळे काढणाऱ्या शिवसेनेची भूमिका मात्र शांत- शांतच असलेली दिसून आली. पहिल्या दिवशीही मराठी भाषण अनुवादित होत नसल्याचा विरोध करण्यासाठी शिवसेनेकडून ते तीन ते चारच सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मंगळवारी देखील मराठी भाषेच्या संदर्भात चर्चा सुरु असताना सभागृहात देखील एकही मंत्री अथवा सदस्य मराठीच्या मुद्द्यावर बोलताना दिसून आला नाही. शिवसेना प्रत्येक वेळेस मराठीचा पुळका मात्र काही आमदार वगळता ते गप्प का? असा सवाल अजित पवार यांच्यासह अनेक विरोधकांनी केला आहे. आयुष्यभर मराठी भाषेसाठी आवाज उचलला तो शिवसेना पक्षातील नेते शांत कसे काय बसले ?असा सवाल विरोधकांनी केला.
विधिमंडळ परिसरात राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेला डावलण्यात आले असल्याचा आरोप सेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी केला. शिवसेनेला फक्त कार्यक्रमातून डावलले जाऊ शकते पण शिवसेनेला मराठीपासून कोणीही लांब ठेवू शकत नाही, असे म्हणून रावते यांनी पांघरून टाकले असले तरी सेनेला डावलण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवं. कार्यक्रमाच्या वेळी मंत्री एकनाथ शिंदे यांना मान देणे गरजेचे होते. मात्र, भाजपकडून तसे करण्यात आले नसल्याची खंत दिवाकर रावते यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या या नाराजीवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खिल्ली उडवली. शिवसेनेला आपला अपमान झाला आहे, असे वाटत असेल तर सेनेने सत्तेतून बाहेर पडावे. शिवसेना सभागृहात वेगळे वागते आणि सभागृहाच्या बाहेर वेगळे वागते. त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही दुटप्पी असल्याचे म्हणत विखे पाटील यांनी बाण मारलाच. असाच बाण काम जयंत पाटलांनी मारला त्यावेळी भाषेचा खून या शब्दावर भार देऊन सुधीरभाऊ कसले संतापले होते.
बर मग कार्यक्रमात डावलले गेल्याचा रावते यांनी काढला तो सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यावर. प्रवेशद्वारा ऐवजी गेट असा उल्लेख केल्याच्या क्षुल्लक मुद्द्यावरून रावते यांनी आक्षेप घेतला. आजच्या दिवशी तरी गेटला प्रवेशद्वार म्हणा अशा शब्दात त्यांनी तावडेंना सुनावले. तावडे साहेब एवढ्याशा गोष्टीने अभिमान जागृत करता आला असता तर आजवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळून गेला असता. बाकी दिल्लीला गेलेल्या सेनेच्या शिष्टमंडळाला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार नाही असे सुनावले, यावरून काही काळ सेनेकडून संताप व्यक्त केला गेला. मात्र अशाने खरोखर मराठी भाषेसाठी आपण काहीतरी करतोय अस जर शिवसेनेला वाटत असेल तर ते तद्दन चुकीचे असावे. असो, मराठी भाषा, कार्यक्रमात डावलने या क्षुल्लक बाबींवरून शिवसेना काही सत्तेतून बाहेर पडणार नाही हे आधीच्या अनेक मोठ्या डावलल्या गेलेल्या घटनांवरून लोकांच्या लक्षात आले आहे.