हरहुन्नरी अभिनेत्री
‘सांस बहू बेटी’ या मालिकेत वयाच्या 7 व्या वर्षी मी पहिली भूमिका केली. वडिलांचं मार्गदर्शन, त्यांची शिकवण मला खूप उपयोगी ठरली. लगेचच मी सात फेरे या झीच्या मालिकेत भूमिका केली आणि मला खर्या अर्थाने ब्रेक मिळाला तो ‘झाशी की रानी’ या मालिकेत.
मराठी चित्रपटाच्या शूटिंगचं वातावरण वेगळं असतं. मी ओढ या चित्रपटात भूमिका करताना मोहन जोशी, भाऊ कदम या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करायचं म्हणजे मनात भीती होती, पण स्टेजवर गेल्यावर मोहन जोशी सर, भाऊ कदम सरांबरोबर एवढ्या छान वातावरणात काम करता आलं आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले, असे उद्गार हिंदी मालिकेतील ‘झाशी की रानी’ उल्का गुप्ता हिने जनशक्तीच्या चॅट कॉर्नरच्या मुलाखतीत सांगितले. तू या क्षेत्रात अगदी लहानपणापासूनच आहेस.
तुला आवड कशी निर्माण झाली?
उल्का – माझे वडील जगन गुप्ता हे गेली कित्येक वर्षे या क्षेत्रात आहेत. त्यांच्यासोबत सेटवर लहानपणापासूनच जात होते. हे सर्व वातावरण अगदी लहानपणापासून पाहिल्यामुळे मलासुद्धा एक अभिनेत्री व्हावे असे वाटत होते. योगायोग झीच्या ‘सांस बहू बेटी’ या मालिकेत वयाच्या 7 व्या वर्षी मी पहिली भूमिका केली. वडिलांचं मार्गदर्शन, त्यांची शिकवण मला खूप उपयोगी ठरली. लगेचच मी सात फेरे या झीच्या मालिकेत भूमिका केली आणि मला खर्या अर्थाने ब्रेक मिळाला तो ‘झाशी की रानी’ या मालिकेतील झाशीच्या प्रमुख भूमिकेमुळे, कदाचित याच भूमिकेमुळे मला ओढ या चित्रपटासाठी विचारणा झाली असावी. माझी मराठी चित्रपटातील ही पहिलीच भूमिका आहे. जरी बिहार हे माझे मूळ गाव असले, तरी मुंबईत राहिल्यामुळे मी उत्तम मराठी संवाद बोलते. मी एका बंगाली चित्रपटातही भूमिका केली आहे.
हिंदी मालिकेच्या सेटवर व मराठी चित्रपटाच्या सेटवरचं वातावरणात काय फरक वाटला?
उल्का – हिंदी मालिका, चित्रपटात पूर्णपणे कमर्शियल वातावरण असते, पण मराठी सेटवरील वातावरण एकदम खेळीमेळीचं, गप्पा-विनोद यामुळे काम करताना कुठलंही दडपण नसल्यासारखं वाटतं. खरंतर मोहन जोशी यांची मी फॅन आहे. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. मराठी कलावंत काम करताना खूप सहकार्य करतात. एक कुटुंबासारखं वातावरण असतं.
कोणती अभिनेत्री आवडते? का?
उल्का – मला स्मिता पाटील ही अभिनेत्री खूप खूप आवडते. त्यांच्या मी हिंदी व मराठी चित्रपटातील भूमिका खूप बघितल्या आहेत. लहानपणापासूनच मला सर्व मैत्रिणी स्मिता पाटीलच्या नावाने चिडवतात, पण त्यांच्या अभिनयावर मी अतोनात प्रेम करते. सध्याच्या अभिनेत्रींमध्ये मला मुक्ता बर्वेचा अभिनय खूप आवडतो. नटसम्राट, दुनियादारी, पुणे-मुंबई हे व इतर मी मराठी चित्रपट आवडीने बघते. काही मालिकासुद्धा बघायला आवडतात.
2018 या नवीन वर्षात प्लॅनिंग काही केलं आहेस?
उल्का- सर्वप्रथम मी माझा ओढ हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणार आहे. या चित्रपटामुळे मराठीत खूप काम करण्याची इच्छा आहे. माझं स्वप्न आहे जर मला नागराज मंजुळे सरांच्या चित्रपटात भूमिका मिळाली, तर खूप आनंद होईल. उल्का गुप्ता तुझ्या सर्व इच्छा, स्वप्नं पूर्ण होवोत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
– गुरुदत्त लाड
सरव्यवस्थापक जनशक्ति, मुंबई
9820003955