ठाणे । विचारे प्रतिष्ठानतर्फे सलग गेली 18 वर्षे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर चमकलेल्या विविध क्षेत्रांतील विविध वयोगटातील मान्यवरांचा मानाचा मराठी गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येत असतो. मराठी गौरव पुरस्कार म्हणजे ऊर्जा बँक आहे, असे मनोगत एबीपी माझाचे असोसिएट सीनिअर प्रोड्युसर आश्विन बापट यांनी व्यक्त केले.
म्हात्रे सभागृहात कै. मनोहर गंगाराम विचारे प्रतिष्ठानचा 19 वा वर्धापन दिन साजरा झाला. त्याअंतर्गत मराठी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्या वेळी प्रमुख अथिती म्हणून आश्विन बापट बोलत होते. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे, समाजसेवक आश्विन शहा हे सन्माननीय पाहुणे म्हणून तर आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार हे अध्यक्षस्थानी होते. विचारे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय विचारे यांनी प्रास्ताविक केले, तर सिद्धी विचारे यांनी आभार मानले. विश्वस्त प्रल्हाद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले. शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच पिलू रिपोर्टर, विज्ञान शिक्षण प्रसारातील अग्रगण्य डॉ. हेमचंद्र प्रधान, क्रीडा पत्रकार संदीप कदम, आंतरराष्ट्रीय खो-खोपटू अनिकेत पोटे, राष्ट्रीय जुनिअर बॅडमिंटन विजेता अमन संजय, दिव्यांग तबला वादक योगिता तांबे, डॉ. जीवराज शहा, राष्ट्रीय मल्लखांब विजेता सागर राणे, मुंबई सेंट्रल येथील मॉडर्न नाइट हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत वाघमारे आदींचा समावेश होता. आदर्श संस्था म्हणून भांडुपच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाचा पुरस्कार अध्यक्ष महादेव बागवे यांनी स्वीकारला. कै. महादेव भिकाजी बने मास्तर यांच्या स्मरणार्थ गेल्या 19 वर्षात 1 लाख वह्या वाटप केल्याबद्दल श्रीमती पार्वतीबाई बने व स्मिता बने तसेच दहावी शालान्त परीक्षेत 96.46% गुणसंपादन केल्याबद्ल ओंकार कोयंडेचा शिष्यवृत्ती देऊन विशेष सत्कार करण्यांत आला.