आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित 9 व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचा समारोप
पुणे : आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला खूप मोठा वारसा आणि संस्कृती लाभली आहे. मात्र, मधल्या काळात त्या वारशाचा आणि परंपरेचा विसर पडून मराठी चित्रपट भरकटला होता. श्वासनंतर आलेले काही मराठी चित्रपट पाहता त्याच समृद्ध वारशाच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाल्याची भावना प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या अर्काइव्ह थिएटरमध्ये आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित 9 व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे आणि आशियाई फाउंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या चित्रपट महोत्सवाची सांगता मिलिंद लेले दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे अभिनीत ’बंदिशाळा’ या नवीन चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाने करण्यात आली. यावेळी मिलिंद लेले, संजय पाटील आणि स्वाती पाटील उपस्थित होते.
मराठी चित्रपट पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा
मी देखील मनोरंजनात्मक, डोक्याला ताप न देणारे करमणूक प्रधान चित्रपट केले. पण या प्रवासाच्या टप्प्यावर थांबून थोडा विचार केला असता, आपण या चित्रपटसृष्टीचे काही देणे लागतो. या चित्रपटसृष्टीचे जबाबदार घटक आहोत, याची जाणीव होऊन बालगंधर्व, काशीनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, अशा अस्सल चित्रपटांकडे वळलो. अनंत माने, प्रभात, व्ही. शांताराम यासारख्यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक समृद्ध राजमार्ग तयार करून ठेवला असून आता या राजमार्गावरून मराठी चित्रपट पुढे नेण्याची जबाबदारी आमच्या पिढीची आहे, असे सुबोध भावे यांनी सांगितले.
सांस्कृतिक राजदूत
गेल्या सतरा वर्षांपासून मुंबईत एशियन फिल्म फेस्टीव्हल यशस्वीरित्या सुरू आहे. मामी हा चित्रपट महोत्सवदेखील मी मुंबईत सुरू केला, परंतु त्यात एशियन फिल्मस्ना विशेष महत्त्व दिले जात नसल्याचे लक्षात आल्याने एशियन फिल्म फेस्टीव्हलची मुहूर्तमेढ रोवली. एशियन फिल्म फेस्टीव्हल हे आशियाई देशांचे एकमेकांचे संबंध वृद्धींगत आणि सशक्त व्हावेत, यादृष्टीने सांस्कृतिक राजदूत म्हणूनच काम करीत आहे, असे किरण शांताराम यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र चित्राव यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले, तर सतीश जकातदार यांनी आभार मानले.