मध्यवर्ती समितीने आपला परीघ थोडा वाढवून नाराजांची मनधरणी करावी व एकीसाठी धडपडणार्या सीमावासीयांच्या प्रयत्नांना थोडी बळकटी मिळवून द्यावी, अशी मागणी होऊ लागली. पण मध्यवर्तीकडूनही असा विचार गांभीर्याने झाला नाही. मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता स्पष्टपणे जाणवू लागल्याने दोन्ही गटात ऐक्य साधले जावे यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु, त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला. बेकीने सीमावासीयांना पुन्हा धडा दिला आहे.
मराठी अस्मितेचा अविरत लढा गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू असलेल्या सीमाभागात मराठी उमेदवारांचे निवडणुकीत पानिपत झाले. हा पराभव मराठी भाषिकांच्या जिव्हारी लागला आहे. समितीच्या नेत्यांमध्ये असलेली दुहीच या पराभवाला कारणीभूत आहे. आता मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी या पराभवास महाराष्ट्रातील नेत्यांना दोष दिलाय तर किरण ठाकूरांच्या गटाचे मत ऐक्याचा अभाव नडला असे आहे. सीमाभागाला यशापयशाचे ग्रहण नवीन नाही. निवडणुकीच्या काळात गटबाजी होत राहते. मात्र, कसल्याही साधनांविना गब्बर उमेदवारांशी लढणे सोपे नाही. अशा वेळी महाराष्ट्रातून सहानुभूती व्यक्त करण्याखेरीज भरीव सहकार्य मिळत नाही, अशी खंत सीमाभागातील मराठीजन करत आहेत. डाव्यांनी समितीच्या प्रचाराला सहकार्य केले होते. त्यातील एक प्रमुख प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी समितीच्या दुहीला कंटाळलेल्या मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांना जवळ करून धडा शिकवला, असे निरीक्षण नोंदवले, तर सीमाभागातील तरुणाईने पराभवाचे खापर उभय गटाच्या नेत्यांवर फोडत त्यांनी आता तरी सुधारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. झाले गेले विसरून नेत्यांनी स्वत:चा अहंकार दूर सारावा, किमान कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी एकत्र यावे, अन्यथा सीमाप्रश्नासाठी हौतात्म्य पत्करलेले हुतात्मे तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत. आता चुकलात तर कार्यकर्ते नेत्यांना पायदळी तुडवतील, असा संताप या भागात तयार झालाय. आता या सार्यातून उभय गटाचे नेते कोणता बोध घेतात यावर सीमाप्रश्नाची सीमा ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमाभागात उमेदवार न देता समितीच्या पाठीशी राहण्याची खंबीर भूमिका घेतली. मात्र, समितीतील दुहीचा फटका निकालातून दिसला. अपेक्षेचे सारे इमले पत्त्यासारखे कोसळले. खानापूरमध्ये आमदार अरविंद पाटील आणि माजी आमदार दिगंबर पाटील गटाचे उमेदवार विलासराव बेळगावकर यांच्यातील मतविभागणीत काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांनी बाजी मारली. निंबाळकर यांना 36, 649 मते मिळाली. ती पाटील (26,613) व बेळगावकर (17,000) यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा कमी आहेत. दुहीच्या राजकारणात मतविभागणीमुळे मतदारांनी काँग्रेसला हात दिला. बेकीमुळे सीमाबांधवांचा घात झाला. बेळगाव दक्षिणमध्येही पेरण्यात आलेल्या बेकीच्या बिजाला पराभवाची कटू फळे आली. सीमानेत्यांच्या कुटिल राजकारणाला कंटाळलेल्या समितीच्या बहुसंख्य मतदारांनी समितीच्या उमेदवारांना झिडकारत कमळ उगवू दिले. प्रकाश मरगाळे यांना 19, 519 मतांवर समाधान मानावे लागले, तर ठाकूर गटाच्या किरण सायनाक यांना 7262 मते मिळाली. भाजपचे अभय पाटील यांनी 68, 670 मते मिळवून विजयी पताका फडकावली. बेळगाव ग्रामीणमध्ये माजी आमदार मनोहर किणेकर (23,776) हे तिसर्या क्रमांकावर लोटले. दुसरे मराठी उमेदवार मोहन बेळगुंदकर यांनी तर हजारीही पार केली नाही. काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कर्नाटकात सर्वाधिक 1 लाख 2 हजार मते घेत विक्रम नोंदवला. हॅट्ट्रिक साधण्यासाठी धडपडणारे भाजप उमेदवार संजय पाटील यांना (50, 316) दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बेळगाव उत्तरमध्ये ठाकूर गटाचे बाळासाहेब काकतकर यांची एकट्याचीच उमेदवारी असतानाही त्यांना अवघी 1869 मते मिळाली. भाजपच्या अनिल बेनके (79,057) यांनी काँग्रेस उमेदवार फिरोज सेठ ( 61,793) यांची हॅट्ट्रिक रोखली.
यशापयशाचे अनेक हेलकावे यापूर्वी बर्याच वेळा सीमाभागाने अनुभवले आहेत. या भागातून एके काळी पाच आमदार निवडून गेले होते. पण, 1999 मध्ये समितीचा एकच आमदार निवडून आल्यावर आता सगळेच संपले अशी आरोळी ठोकली गेली. पण, 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आले. 2008 मध्ये मराठी बांधव राहत असलेल्या मतदारसंघात फोडाफोडी करण्यात आली. परिणामी, समितीचे सगळे उमेदवार पडले. तेव्हाही असाच गदारोळ उठला होता. पाच वर्षांपूर्वी वातावरण बदलले आणि संभाजी पाटील, अरविंद पाटील ही जोडगोळी विधीमंडळात पोहोचली. आता पुन्हा दुही आणि अहंभाव नडला. मराठी पाऊल पुढे पडण्याऐवजी मागे फेकले गेले. यातून सीमावासीयांचे नेते काही धडा घेणार आहेत का?
– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111