रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत दिली मुलाखत
ठाणे : गुजराती, मल्याळी प्रेक्षक आपल्या भाषिक कार्यक्रमांबाबत कमालीचे जागरुक असतात. मात्र, मराठी प्रेक्षकांची ग्राहक म्हणून असलेली जागरूकता चॅनल्सवरील कार्यक्रमाविषयी दिसत नाही. चॅनल्सवरील कार्यक्रमांच्या गुणवत्तेबद्दल मराठी प्रेक्षकांनी जागरुकता दाखवणे गरजेचे आहे, असा कळकळीचा सल्ला प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. गिरीश ओक यांनी दिला. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना आपल्या मुलाखतीत ते बोलत होते. मराठी माणसांच्या ग्राहक आणि प्रेक्षक अशा दोन प्रवृत्ती दिसतात. ग्राहक म्हणून प्रत्येक वस्तूंची एमआरपी, वस्तूंची अंतिम तारीख तो निरखून पाहतो. वस्तुचा भावही नीट करतो. ग्राहक म्हणून दिसणारी मराठी माणसांची जागरुकता टीव्हीवर दाखवल्या जाणार्या चॅनल्सवरील कार्यक्रमाबाबत कुठे जाते? असा प्रश्न डॉ. गिरीश ओक यांनी उपस्थित केला.
आपल्या अभिनय क्षेत्रातील संघर्षाच्या आठवणींना ओक यांनी यावेळी उजाळा दिला. नाटकाच्या वेडापायी नागपूरहून मुंबईत येताना चांगले चालणारे दोन्ही दवाखाने बंद करून, 56 खोल्यांचे घर सोडून, ऐषोआरामाचे जीवन सोडून विदर्भ संघाच्या इमारतीत दरदिवशी 10 रुपये भरून लोखंडी खाटेवर झोपत असे. विनातिकीट प्रवास करून पैसे वाचवून केवळ एकवेळच्या जेवणावर अन् चहावर दिवस काढल्याचे ओक यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ओक म्हणाले, सुरुवातीला नाटकात नटाचे रिप्लेसमेंट म्हणून काम मिळाले. अवहेलना, कुचंबणा, उपासमार, अपमान सारे काही सहन केले. 1984 ते 1988 या पाच वर्षांच्या या संघर्ष काळात, जागेची, जन्माची, मित्रांची, माणसांची सर्वांची किंमत कळाली. पहिले स्वतंत्र नाटक दीपस्तंभ मिळाले आणि भोगलेले सारे ज्वालामुखीसारखे उसळून आले. ते सगळे दबलेले, दाबलेले दीपस्तंभ या नाटकामध्ये जीवतोड अभिनय करताना निघाले. यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. आपण मजबूत असू तर सगळे बदलू शकतो, असा विश्वास ओक यांनी यावेळी व्यक्त केला.
रसिकांचा उदंड प्रतिसाद
डॉ. गिरीश ओक यांनी आपल्या संपूर्ण मुलाखतीत रसिक प्रेक्षकांना आपल्या अभिनयाप्रमाणेच खिळवून ठेवले. अनेक किस्से, अनुभव, आकाशमिठी या नाटकाच्या प्रयोगाचा अविस्मरणीय प्रसंग सांगून सतत हसत ठेवले. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो. हे वाक्य सतत सांगत, आपण मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कसे केले हे सांगण्याचा व अभिनयाच्या क्षेत्रात येणार्यांना यातून प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. नाटक, सिरियल, सिनेमा यांचे कार्य कसे चालते याचेही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपली अभिनयाची सुरुवात ठाण्यात झाल्याचा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला. डॉ. गिरीश ओक यांना ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.