नवी मुंबई । वाशी सेक्टर – 30 अ येथे सिडकोने महाराष्ट्र भवनसाठी दोन एकरचा भूखंड गेली 15 वर्षांपासून आरक्षित ठेवूनही तेथे महाराष्ट्र भवन न बांधल्याच्या निषेधार्थ आज मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी 2018 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सदर भूखंडावर हा भूखंड महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित आहे व सदर भूखंडावर कोणतेही अतिक्रमण करू नये, या आशयाचा नामफलक लावून सिडको व राज्य शासनाचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. मनसैनिकांनी सिडको व राज्य शासनाविरोधात घोषणा देऊन भूखंडाचा परिसर दुमदुमून सोडला. यावेळी महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, सिडको आणि राज्य शासनाचा निषेध असो निषेध असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, या घोषणा महाराष्ट्र सैनिकांनी दिल्या.
सदर भूखंडावर काही महिन्यांपूर्वी ही जागा महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित असल्याचा नामफलक सिडकोने लावला होता. मात्र, काही महिन्यांपासून तो फलक सदर भूखंडावर दिसत नसल्यामुळे सदर भूखंड सिडकोला बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे तसेच सिडकोचा हा डाव हाणून पाडण्यासाठीच सदर भूखंडावर आज महाराष्ट्र भवनचा नामफलक लावल्याचे मनसेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.नवी मुंबई शहरात विविध राज्यांतील लोकांना त्यांच्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार करता यावा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडता यावेत यासाठी सिडकोने आतापर्यंत वाशी रेल्वेस्थानक परिसरात आत्तापर्यंत वाशी रेल्वेस्थानक परिसरात उत्तराखंड, ओडिसा, आसाम, केरळ, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि उत्तर प्रदेश भवनसाठी भूखंड सिडकोने दिले आहेत.
भूखंडावर महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन करावे
मात्र महाराष्ट्र भावनच्या भूखंडावर अजून साधी वीटही रचलेली नाही. महाराष्ट्र भवन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकण, खानदेश, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणांहून विविध कामांसाठी मुंबई व आजूबाजूच्या शहरात येणार्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईत येत असतात. मात्र, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात राहण्याची त्यांना कोणतीही सोय नसते. या आंदोलनातून सिडकोने धडा घेऊन 1 मेपर्यंत सदर भूखंडावर महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 1 मे रोजी महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र भवनची वीट रचून भूमिपूजन करतील, असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सिडको व राज्य शासनाला दिला आहे.