मराठी भाषादिनी स्मृतीकुसुमांजली

0

मुंबई । बहुकला संपन्न, जागतिक कीर्तीचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक म्हणून गुरू आचार्य पार्वतीकुमार यांचे सांस्कृतिक क्षेत्रात सन्मानाने नाव घेतले जाते. चित्रपट, नाटक, नृत्यनाटिका अशा विविध क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. भरतनाट्यम्बरोबर इतर भारतीय नृत्यांचा प्रचार आणि प्रसार होण्याच्यादृष्टिने त्यांनी अनमोल कामगिरी केली होती. तंजावर नृत्यशाळा या स्वत:च्या स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून भरतनाट्यम् या नृत्यशैलीला जगभर मान्यता मिळेल यासाठी कार्य केले. यासाठी अभिनय दर्पण ही कलाकृती रंगमंचावर अविष्कारीत केली. देख तेरी बंबई, डिस्कव्हरी इंडिया, पंचतंत्र, दुर्गा झाली गौरी, आपला हात जगन्नाथ या कलाकृती नृत्यनाटकातून सादर करून या कलेला प्रतिष्ठा मिळवून दिली.

दाग, बदमाश, विश्‍वामित्र मेणका, दिल देखे देखो, तुमसा नहीं देखा, जय महालक्ष्मी, काले गोरे आदी अनेक चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलेले आहे. अठ्ठ्याणवव्या वर्षाच्या जयंतीचे निमित्त घेऊन त्यांची शिष्या डॉ. संध्या पुरेचा यांनी स्वत:च्या सरफोजी राजे भोसले सेंटरच्यावतीने स्मृतीकुसुमांजली शास्त्रीय नृत्य आणि वादन या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन 27 फेब्रुवारी मराठी भाषादिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे पु. ल. देशपांडे अकॅडमी इथल्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी 7.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि नृत्याचा सुरेख मिलाफ यानिमित्ताने उपस्थितांना अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात मनीपुरी नृत्यांगणा दर्शना झवेरी व लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अतुल तिवारी हे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेल्या वादक, नृत्यांगणांना कलाविष्कार घडविण्यासाठी निमंत्रित केलेले आहे. डॉ. अनना गुहा या कथ्थक नृत्य सादर करणार आहेत.