मराठी भाषा वैचारीक आणि सांस्कृतिक अंगाने संपन्न करणारा ज्ञानाचा सागर

0

आमदार हरीभाऊ जावळे ; भालोद विद्यालयात विद्यापीठस्तरीय एकदिवसीय चर्चासत्र

भालोद- मराठी हा केवळ भाषा विषय नसून तो मराठी मनाला वैचारीक आणि सांस्कृतिक अंगाने संपन्न करणारा ज्ञानाचा सागर आहे त्यामुळे मातृभाषेतील शिक्षण ज्ञानासोबत संस्कार आणि आचार-विचारांची शिदोरी देते, असे प्रतिपादन आमदार हरीभाऊ जावळे यांनी येथे केले. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व कला, विज्ञान महाविद्यालय, भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रथम वर्ष कला, मराठी विषयाच्या पुर्नरचित अभ्यासक्रमावरील विद्यापीठस्तरीय एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.आशुतोष पाटील, माजी अधिष्ठाता व मराठी अभ्यास मंडळ प्रमुख डॉ.शिरीष पाटील, अभ्यास मंडळ सदस्य डॉ.वासुदेव वले, डॉ.जिभाऊ पाटील, डॉ.फुला बागुल, डॉ.शारदा मोरे, से.ए.सोसायटीचे चेअरमन दिलीप चौधरी, व्हा.चेअरमन हेमलता इंगळे, संचालक कृषिभूषण नारायण चौधरी, प्राचार्य डॉ.अजय कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्ञान-विज्ञाना सोबत मातृभाषेतील शिक्षणही बदलले
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांनी बदलत्या ज्ञान-विज्ञाना सोबत मातृभाषेतील शिक्षण ही बदलत असल्याचे सांगत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर आपला भर असून जगाच्या स्पर्धेत एक सक्षम युवक म्हणून आपल्या विद्यापीठाचा विद्यार्थी कसा उतरेल या अनुषंगाने नव्या मार्गदर्शक धोरणाने आपण आपले अभ्यासक्रम सीबीसीएस पद्धतीने निर्माण करीत आहोत. त्यासाठी अश्या चर्चासत्रातून अध्यापकांनी शोध-निबंध सादर करून चर्चा केल्या तर योग्य ते बदल वेळीच करता येतात. त्या संदर्भाने ही चर्चासत्र महत्वाची ठरतात, असे ते म्हणाले.

यांनी घेतले परीश्रम
दुपारची दोन सत्रे अनुक्रमे डॉ.फुला बागुल आणि डॉ.वासुदेव वले यांच्या अध्यक्षतेखाली झालीत. या प्रसंगी जामनेर महाविद्यालयातील डॉ.अक्षय घोरपडे लिखीत काव्यंकुर: स्वरूप आणि समीक्षा या संदर्भ ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक चर्चासत्राचे समन्वक प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी तर सूत्रसंचालन डॉ.सुनील नेवे यांनी केले. आभार डॉ.दिनेश पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.जतीन मेढे, डॉ.दिनेश पाटील, डॉ.सुनील नेवे, डॉ.वर्षा नेहेते, डॉ.दिनेश महाजन, डॉ.वसंतराव पवार, डॉ.डिंगबर खोब्रागडे, प्रा.मुकेश चौधरी, प्रा.मुकेश पवार आदींनी परीश्रम घेतले.