मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न शक्य : ऐनापुरे

0

मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमात केले प्रतिपादन

पिंपरी : मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे. मराठी ही ज्ञानभाषा होण्याच्या योग्यतेची भाषा आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. जे सहज शक्य आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे यांनी रावेत येथे व्यक्त केले. रॉयल कासा सोसायटीमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नुकताच कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून ऐनापुरे बोलत होत्या.

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची प्रतिमा आणि लीळा चरित्राचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. मराठी मातृभाषा नसतानाही मराठीतून साहित्यसेवा करणारे कवी दीपेश सुराणा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रवचनकार शोभा करमासे, कथाकार प्रकाश निर्मळ उपस्थित होते.

मातृभाषेतून शिकण्याचा आनंद
कथाकार निर्मळ म्हणाले की, भाषिक न्यूनगंडाची भावना आपण मनातून काढून टाकली पाहिजे. इंग्रजीवर अनावश्यक भर दिल्याने मुलांचा मातृभाषेतून शिकण्याचा आनंद हिरावून घेतला जात आहे. तर मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे कवी सुराणा यांनी सांगितले. कवी सुराणा यांनी सादर केलेल्या ‘फेसबुकच्या जगात’ या कवितेला उपस्थितांची दाद मिळाली. मीरा कुलकर्णी, गौरी दळवी, डॉ. श्यामल निर्मळ, उमेश भंडारी, सुभाष कारंजे आदी उपस्थित होते. गीता कालेकर यांनी आभार मानले.