मराठी भाषा ही स्वातंत्र्याची समज देणारी तिला जपा!

0

जळगाव । भाषेचा सत्ताधीश जग हलवू शकतो. भाषेमध्ये सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे ती समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने मराठीमय वातावरण तयार केले पाहिजे. कोणत्याही भाषेचा मृत्यु आपल्या अस्तित्वाला संपवत असतो. मराठी भाषा ही आपल्याला स्वातंत्र्याची समज देणारी असल्याने ती जपली गेली पहिजे. ज्ञानभाषा होण्याची क्षमता तिच्यात नक्कीच आहे असे प्रतिपादन गझलकार कमलाकर देसले यांनी केले. ते प्रसिध्द कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिन अर्थात मराठी भाषा दिनानिमित्त सोमवारी 27 रोजी ककेसीई सोसायटी संचलित मू.जे.महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ज्ञानेश्‍वर, तुकाराम, एकनाथ यांनी मराठी भाषेचे सांगितलेले महत्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. ‘आई तू शिकायला पाहिजे’ ही कविता त्यांनी यावेळी उपस्थितांना ऐकविली.

त्यांच्या गझल, शेर-शायरीने रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रा. चारुता गोखले, प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा. हेमलता सोनावणे यांचे सहकार्य लाभले. उपप्राचार्य प्रा.एन.व्ही.भारंबे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यार्थ्यानी केले सादरीकरण
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मू.जे.महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाच्या विद्यार्थ्यानी मी मराठी, महाराष्ट्राची लोकधारातील, घनश्याम सुंदरा, शेतकरी गीत, जोगवा, माय मराठी या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. गाभारा, आगगाडी व जमीन, स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कुसुमाग्रजाच्या कविता यावेळी विद्यार्थ्यानी सादर केल्या. हे वर्ष प्रसिध्द कांदबरीकार गो.नी.दांडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांच्या साहित्यावर विद्यार्थ्यानी लिहिलेल्या कुणा एकाची भ्रमणगाथाः गोनीदा वाड्मय परिचय या परिचयात्मक आणि समीक्षणात्मक लेखांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

पुस्तकांची पारायण करायला हवे
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यकम्राच्या अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.उदय कुलकर्णी होते. मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. इंग्रजीचा वापर जरुर करा परंतु मराठी भाषेला विसरू नका तिच्यातून आपली संस्कृती पांझरते. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम केले आहे. कुसुमाग्रजांच्या पुस्तकाचे पारायण करायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयातील मुख्य इमारतीत कुसुमाग्रजांच्या निवडक आणि लोकप्रिय कवितांचीप्रदर्शनी लावण्यात आली होती.