मराठी माणूस असेपर्यंत गदिमांचे गीतरामायण टिकून राकहणार – डॉ. सबनीस

0
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि लायन्स क्लब इंटरनॅशनलच्यावतीने कविता महोत्सवाचे आयोजन
महोत्सवाची वृक्षपुजनाने केली सुरूवात
भोसरी : गदिमांनी एकाहून एक सरस रचना केल्या आहेत. मराठी साहित्यामध्ये ग.दि.माडगूळकर यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी माणूस जिवंत असेपर्यंत गदिमांनी रचलेले गीतरामायण टिकून राहणार आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भोसरी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यातर्फे गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवाची सुरुवात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, दिग्दर्शक नागराज मंजुळे, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते वृक्षपूजनाने करण्यात आली. यावेळी महापौर राहूल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, मसाप शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा आदी उपस्थित होते.
या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘चित्रमहर्षी’, ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ ‘शब्दयात्री’, लोककलावंत रेखा मुसळे ‘गदिमा लोककला’, भोसरीतील समता विद्यालय व दिघीतील रामचंद्र गायकवाड विद्यालय यांना ‘संस्कारक्षम शाळा’, श्रीकांत नेऊरगावकर व संदीप कुदळे यांना ‘उद्योगभूषण’ आणि नारायण पुरी यांना ‘काव्यप्रतिभा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कविता काळजाला भिडणार्‍या
सत्काराला उत्तर देताना रमेश देव म्हणाले की, कवी, लेखक, चित्रकार व नट म्हणून त्यांनी वेगळा ठसा उमटविला. गदिमा हे सिद्धहस्त कवी होते. दहावीसुद्धा पास न झालेल्या गदिमांनी गीतरामायणासारखे अजरामर काव्य लिहिले. त्यामुळे मला त्यांच्यामध्ये संत तुकाराम दिसतात. त्यांच्या कविता काळजाला भिडणार्‍या आहेत. म्हणूनच अण्णांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी मोठा आहे. नागराज मंजुळे म्हणाले की, प्रेम ही जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याला जाती-धर्माचा रंग देऊ नका. संस्कृती आणि धर्मापेक्षा निसर्ग महान आहे असे म्हणाले. आमदार महेश लांडगे यांनी आई वडिलांचे प्रेम संपादित करा. त्यांचे प्रेम समजून घ्या असे आवाहन केले.
कविता केल्या सादर
शून्य एक मी व उन्हाचे घुमट खांद्यावर या काव्यसंग्रहांना गदिमा साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘आम्ही गदिमांचे वारसदार’ म्हणून निमंत्रित केलेल्या प्रशांत केंदळे, पितांबर लोहार, लीनता आंबेकर, शिवाजी बंडगर, कविता काळे, इंद्रजित घुले, शीतल गाजरे, अनंत मुंढे या राज्यातील आठ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी गदिमा लोककला पुरस्कार प्राप्त रेखा मुसळे यांनी लावणीनृत्य सादर केले. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.दिगंबर ढोकले व भरत दौंडकर यांनी केले. नागेश वसतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि आशिया मानवशक्ती विकास संस्था यांचे सहकार्य लाभले.