जिवा शिवाची बैल जोडं, जाईल बिगीनं आपली पुढं
डौल मोराच्या माणसा रं, डौल माणसा..
येगं रामाच्या बाणाचा रं, येगं बाणाचा…
महाराष्ट्रातली खेडी तशी स्वयंपूर्ण. दारात चार कोंबड्या, शेळ्या-मेंढ्यांसह गावठी पाळीव काळं कुत्र, एक बैलजोडी आणि शिवारातलं पडकं घर ही पिढीजात ‘गडगंज’ संपत्ती सांभाळत कुटुंबाचा गाडा हाकला जातो. संपूर्ण कुटुंबासह शिवारात वर्षभर राबराब राबून एक दिवस खपून जाण्यात धन्यता मानणारी परंपरागत कृषी संस्कृती. केंद्र सरकार, राज्य सरकार काय मदत देईल, याची तमा न बाळगता ऋतुमानानुसार सूर्योदयापासून उपलब्ध साधनसामग्रीत शिवार फुलवायचं, हा एकमेव ध्यास…
कोकणसह कोल्हापूर, सातारा, सांगली, विदर्भ, मराठवाड्यात आजही पारंपरिक पद्धतीने शेती मोठ्या उत्साहाने केली जाते. शेतीतून काय होतो फायदा? याचा मुलाहिजा न राखता पिढीजात शेती करून उदरनिर्वाह करणं, हा एक घराणेशाहीचा ठरलेला दंडक. शेतात वर्षभर राबल्यानंतर येणार्या पिकावर कुटुंबाच्या गरजा भागवण्याची मदार. आलेल्या पिकातून पोरांचं शिक्षण, आबालवृद्धांचं आजारपण यांसह शेतीला लागणारी अवजारं, बी-बियाणं यासाठी लागणारा पैसा, याची जरी तजवीज झाली, तरी हे वर्ष सुखाचं गेलं, अशी सुखी जीवनाची संकल्पना. पुढच्या वर्षाचं काय ते बघू… हे वर्ष चांगलं गेलंय ना. पुढचं पुढं, असं म्हणून स्वत:ची समजूत काढून समृद्ध जीवन अंगीकारणार्या बळीराजाच्या आयुष्यात मनोरंजन ते काय असतं? असा प्रश्न समोर येतो.
वर्षभराचा राबता, उकिरडा वाहण्यासाठी असलेली बैलाच्या जोडीलाच गाडीला जुंपून हा बळीराजा आपली मनोरंजनाची हौस भागवून घेतो. शिवारातली कामं उरकल्यानंतर बैलांना धष्टपुष्ट बनवून गावपातळीवर त्यांना स्पर्धेत उतरवतो. पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या हौसेने आपले बैलगाडीला जुंपतात. त्यातही आपल्या बैलाने पहिला नंबर मिळवावा आणि बक्षिसाची ढाल आपल्याला सन्मानाने मिळावी, अशा ईर्ष्येेने जो तो पेटलेला असतो. स्पर्धेला जत्रेचं स्वरूप येतं. स्पर्धेच्या ठिकाणी मंडप उभारला जातो. गावचा पोलीस पाटील, सरपंचासह तालुक्याहून आलेले मान्यवर मोठ्या थाटात मंचावर वावरत असतात. त्यात स्पर्धक बैलजोड्यांच्या मालकांची नावं जाहीर केली जातात. स्पर्धेसाठी सीमारेषा आखून दिली जाते. पंच नेमले जातात. नियम ठरतात आणि पहिली जोडी पळण्यासाठी सीमारेषेवर येते. या जोडीचा मालक फेटा उडवत समोर येतो. आपलीच जोडी स्पर्धा मारणार, या आविर्भावात फुशारक्या मारतो. या वेळी त्याचा रुबाब काही औरच असतो, तर गाडीचा चालक बैलांच्या पुढं जाऊन पळण्यासाठी तयार असतो.
काही वेळा हा चालक गाडीतून बाहेर फेकला जातो. मात्र, आपल्याला काही लागले नाही असे भासवून पुन्हा तेवड्याच जोशानं गाडीत चढून गाडी हाकतो आणि आपण किती पट्टीचा चालक आहे, हे दाखवतो. स्पर्धेत काही गाड्या रस्ता सोडून भरकटतात. अशावेळी चालकाला पुन्हा ही गाडी मार्गावर आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, तर काही वेळी प्रेक्षकांमध्ये गाडी घुसल्याने त्यांची एकच धावपळ होते. अशा तर्हेनं दिवसभर ही स्पर्धा सुरू असते. मनोरंजनाचे अन्य साधन नसल्याने गावात वर्षातून एकदा होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी आबालवृद्ध आलेले असतात.
गेल्या काही वर्षांत स्पर्धेचं हे गावपातळीवरचं स्वरूप बदलून ते व्यापक झालं. राज्यपातळीवर स्पर्धा होऊ लागल्या. त्यामुळे बक्षिसाची रक्कमही वाढत गेली. यात मनोरंजनाबरोबर या स्पर्धेला व्यावसायिक रूप आलं आणि हे मोठं बक्षीस आपल्याच जोडीला मिळावं, असे प्रयत्न सुरू झाले. बैल त्वेषाने पळावेत यासाठी अघोरी प्रयोग त्यांच्यावर करण्यात आले. जसे त्यांच्या चाबकाला आतून खिळे टोचणे आदी. यामुळे रक्त येईपर्यंत मारणे व त्यांच्या शेपटीला चावा घेणे आदी प्रकार समोर आले. पर्यायाने या पशूंची होणारी परवड पाहता याला रोख बसवण्यासाठी कायदेशीर इलाज करण्यात आला. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. गत चार वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयानुसार बैलगाडीच्या स्पर्धांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यातील दुसरी बाजू पाहिल्यास यामुळे गावशिवारातील बळीराजाचे वर्षभरातून एकदा होणारे मनोरंजनही थांबले आहे.
तामीळनाडूत जलीकट्टूला जर मान्यता मिळत असेल, तर महाराष्ट्रात स्पर्धेदरम्यान बिगर फटका असे काही नियम घालून स्पर्धा भरवण्यास परवानगी दिल्यास या स्पर्धा पुन्हा भरवल्या जातील व बळीराजासह खेडूतांच्या चेहर्यावर तरळणारा आनंद काही विरळाच असेल…
– महेश जाधव
8652390637