धानोरा। चोपडा तालुक्यातील धानोरा येथे चक्क मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी माध्यमाची शाळा भरवली जात असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्रीय मराठी शाळेत ग्रेडेड मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी संगणमताने एका खाजगी संस्थेतील शिक्षक व काही राजकीय पुढार्यांना दरमहा 1700 रुपये भाडे तत्वावर शाळा दिली आहे.
उपोषणाचा इशारा
मराठी माध्यमाच्या शाळेत भरविली जात असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा तात्काळ बदं करण्यात यावी अशी मागणी धानोरा येथील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रतिभा ज्ञानेश्वर सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत शिक्षणमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, शिक्षण सभापती यांना पाठविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची शाळा कोणाच्या आदेशान्वये व नियमान्वये खाजगी संस्थेला देण्यात आली आहे याबाबत त्यांनी विचारणा केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व संबंधीत खाजगी संस्थाचालकावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रतिभा सोनवणे यांनी दिला आहे.