अलिबाग: महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपन्यांमधील मराविमं अधिकारी संघटनेच्या ४३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे अलिबाग येथे ८ रोजी उद्घाटन झाले. वीज कंपन्या तांत्रिक स्वरुपाच्या असल्या तरी अतांत्रिक अधिकाऱ्यांची भूमिका व योगदान महत्वाचे असल्याचे मत रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधीक्षक पारसकर म्हणाले की, वीज ही आता मुलभूत गरज झाली आहे. अतांत्रिक अधिकारी हे तांत्रिक कंपनीमध्ये सहाय्यभूत व आधारभूत घटक आहेत. कंपनी अंतर्गत कामकाज गतीमान करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे. तसेच अधिवेशनामध्ये चांगल्या संकल्पाची देवाणघेवाण करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापारेषणचे कार्यकारी संचालक गमरे म्हणाले, की सध्या वीजक्षेत्रातील आव्हानांचे स्वरुप बदलत आहे. या नव्या आव्हानांचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे.
अधिवेशनाच्या उद्घाटन अध्यक्षस्थानी महापारेषणचे कार्यकारी संचालक सुगत गमरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणचे प्रभारी संचालक अनिल कालेकर, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक सतीश तळणीकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनंत पाटील, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विकास आढे, सरचिटणीस डी. आर. शिंदे आणि संघटन सचिव प्रविण बागुल आदींची उपस्थिती होती.