आला सास, गेला सास, देवा तुझ रे तंतर, अरे जगन-मरन, एका सासाच अंतर!
वरील ओळी बहिणाबाई चौधरी यांच्या असून त्यांनी मानवी जीवनाच वर्णन किती अर्थपूर्ण रचनेतून केलेले आहे. खरं तर मानवी जीवन हे असंच! ते आज आहे तर उद्याला नाही, माणसाच्या आयुष्यातील शेवटचा क्षण कोणता असेल ते आपल्याला सांगता येत नाही. म्हणून ‘जीवन जगत असताना जगाच्या या रंगमंचावर असे काही करून जा, की तुमची भूमिका संपल्यावरसुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे!’ सर्वच प्राणीमात्रात मानव हा संवेदनशील प्राणी आहे. कारण तो एकमेकांशी संवाद साधू शकतो, आपल्या भावभावना इतरांना वाटून दुसर्यांच्या भावना जाणून घेऊ शकतो, इतरांना तो भावनिक आधार देऊ शकतो. त्यामुळेच टोळी करून रानटी अवस्थेत जीवन जगणारा हा मानव प्राणी आपली उन्नती साधू शकला, अवकाशाला गवसणी घालू शकला.
विज्ञानाची उपासना करून अनेक अमौलिक यंत्र-तंत्रे त्याने विकसित केलीत. मानवाला अचंबित करेल, असे मोठमोठे फौलादी यंत्रे, गगनचुंबी इमारती, धरणेे, विमान तयार करणारे कारखाने, गिरण्या, क्षणात जग जवळ आणणारे यंत्र एवढेच नाही तर मानवासारखा हुबेहूब कामे करणारा मानव यंत्रसुद्धा त्यांनी तयार केला. प्रचंड मोठ्या प्रमाणात कारखाने उभारून मोठमोठे आधुनिक यंत्र आपण केले. परंतु, मानवाला जीवनदान देणारे कृत्रिम रक्त व मरणाच्या दारातून परत आणणारा मानवी श्वास तो तयार करू शकला नाही. त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक दिवस मरण अटळ आहे, हे त्रिकालिक सत्य या जगातील कोणताही मानव नाकारू शकत नाही. याला अपवाद म्हणून दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी मोठी तपचर्या करून संजीवनी विद्या संपादन केली होती. मानवाला जिवंत करण्याचे तंत्र हस्तगत करून मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची अदभुत शक्ती त्यांनी हस्तगत केली होती. पण ती झाली दंत कथा, कथेत काल्पनिक गोष्टी रंगवल्या जातात पण मानवी जीवनात नाही. जीवन हे सुंदर असून ते प्रत्येकाला हवंहवंस वाटतं, पण त्याला कुठून कधी कीड लागेल याची शाश्वती नसते.म्हणून जीवनातील प्रत्येक क्षण हसत जगायला हवं! जीवन किती जगले हे महत्त्वाचे नसून, ते कसं जगलं हे महत्त्वाचे आहे. येणारा कोणताही क्षण आपल्या जीवनातील शेवटचा क्षण असू शकतो, ही सत्यता लक्षात घेऊन आपण जगायला हवे! पण असे होतांना दिसून येत नाही. मानवच मानवाचा आज शत्रू झाला असून, समाजमन संवेदन शून्य झालं की काय? असा प्रश्न समाजातील घडत असलेल्या प्रसंगातून निर्माण होतो. स्वतःचे श्रेष्ठतत्व सिद्ध करण्याच्या नादात तो इतरांवर चिखलफेक करायला मागे पुढे बघत नाही.असत्याचा मार्ग स्वीकारून स्वतःचे श्रेष्ठत्व गाजवताना आपण कुणाच्या तरी भावना नकळत दुखवून जात आहोत, याचे भानही त्याला नसते. केवळ मी शहाणा आणि इतर वाईट, अशी भावना समाजातील काही लोकांची असते. मी पणाचा अहंकार त्याला इतरांना त्रास देण्यास पुरा पडतो. पण तो हे विसरून बसतो की सूर्याला कितीही झाकून ठेवले, तरी त्याचा प्रकाश आपण अडवू शकत नाही.
भारत देशात असे अनेक संतपुरु, किती वीरपुरुष, किती समाजसुधारक होऊन गेलेत, त्यांच्या तेजस्वी कार्याची दीपमाळ आपल्या समोर पाजळत असून त्यांच्याच विचार मार्गांनी आपण प्रवास करायला हवा. माणूस हा त्याच्या कार्याने, कृतीने व कर्तुत्वाने मोठा होत असतो, हे आपण नेहमी लक्षात घ्यायला हवं. दुसर्याच्या भावना, दुःख आपण समजून घेत जीवन जगायला हवं. जीवनात जर आपण कुणाला हसवू शकलो नाही, तर कमीत कमी त्याला रडवू शकणार नाही, याची काळ्जी आपण घ्यायला हवी! समाजात तुमचा मानसन्मान, ओळख तुमच्या कार्य व कर्तृत्वावर होते तेव्हा ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या त्या क्षेत्रात आपले कार्य, कौशल्य शिगेला पोहाचायला हवे, हाच आपल्या यशाचा खरा मार्ग असतो. आपल्या कर्तृत्वाचा ठसा जोपर्यंत समाजात उमटत नाही, तोपर्यंत खर्या अर्थाने आपली ओळख समाजाला होऊ शकत नाही, असे मला वाटते. समाजाला जे जे देता येईल ते ते देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आज महागाईमुळे स्वतःच्या कुटुंबाचे पोषण आपण नीट करू शकत नाही, मग या समाजाला आपण काय देणार? असा प्रश्न नक्कीच आपल्या समोर येईल, पण आर्थिकदृष्ट्याच आपण समाजाला मदत करू शकतो, हा भ्रम आपण सोडायला हवा! समाजातील लाखो लोकांना मानसिक बळाचीसुद्धा गरज असते हे लक्षात घेऊन ते बळ आपण गरजवंताला दिला तरी आपल्या जीवनाच स्वार्थक होऊ शकते, असे मला वाटते! ते बळ आपण एखाद्या गरजवंत मुलाची फी भरून, एखाद्या अंध व्यक्तीला मदतीचा हात देऊन, एखाद्याला मानसिक आधार देऊन, निराधाराची सेवा करून ,वाईट प्रसंगांत साथ देऊन तर मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करूनही या समाजाचे ऋण आपण फेडू शकतो. आपल्याला ह्या मोह पाश्यात अडकून न राहता आपले कार्य, हे जग सोडून जायच्या पूर्वी करून जायचे आहे. त्यामुळे वेळेच भान आपण ठेवायला हवं! जीवनातील प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असून ते मौल्यवान क्षण चांगल्या कार्याला आपण समर्पित करायला पाहिजे.
– प्रा. वैशाली देशमुख, नागपूर
7420850376