भगत सुरेश मोरे यांनी ओढल्या गाड्या
जळगाव-शहरातील टॉवर चौकापासून ते भिलपुरा चौकापर्यंत सोमवारी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी मरीमातेच्या जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. गेल्या 145 वर्षांची परंपरा असलेल्या बारागाड्या ओढण्याचा मान सुरेश मोरे या भगताला मिळाला. मोरे गेल्या पाच वर्षापासून बारागाड्या ओढत आहे.
भील समाजातर्फे श्रावणातील शेवटच्या मंगळवारी मरीमातेच्या बारागाड्या जळगाव शहरात गेल्या 145 वर्षापासून ओढण्यात येत आहे. भिलपुरा परिसरात असलेल्या मंदिरातील मरीमातेची भगत सुरेश मोरे यांनी पुजा-अर्चा केल्यानंतर गुलाल उधळीत सर्व भक्त फुले मार्केटमधील मरी मातेच्या मंदिरावर पोहचले. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास टॉवर चौकापासून भिलपुरा चौकापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या.
भाविकांचा जल्लोष
बारागाड्या ओढण्यात येत असल्याने पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक येत असतात. भगताचा आर्शिवाद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, मार्केटच्या पहिल्या माळ्यावर नागरिकांची गर्दी दिसून आली.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मेहतर समाज बांधवाची छडी आणि बारागाड्या एकाच दिवशी असल्याने पोलिसांनी योग्य नियोजन केले होते. एकच मार्गे असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होवू नये यासाठी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर आणि जमावावर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.डी.पाडळे यांच्यासह कर्मचारी लक्ष ठेवून होते.