मुंबई । मध्य रेल्वेद्वारे सतत प्रवाशांना विनातिकीट प्रवास न करण्याची विनंती केली जाते. मात्र, दरवर्षी समोर येणार्या आकड्यांवरून या विनंतीची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव समोर येते. आकारण्यात येणार्या दंडाचे आकडे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. शेवटी याचा फायदा रेल्वेलाच होत आहे. मध्य रेल्वेने गेल्या 6 महिन्यात दंड म्हणून तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2017 दरम्यान विनातिकीट प्रवास करणार्यांविरुद्ध सुरू केलेल्या अभियानांतर्गत 100.67 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी 17.82 टक्क्यांनी वाढ
ऑक्टोबर 2016 साली विनातिकीट आणि बेकायदा पद्धतीने सामानाची वाहतूक करणार्यांकडून तब्बल 2.88 लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यात यावर्षी तब्बल 17.82 टक्क्यांनी वाढ झालेली दिसते. ऑक्टोबर 2017 मध्ये दंडाच्या स्वरुपात 17.66 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर, ऑक्टोबर 2016 साली 13.51 कोटी रुपये होता आणि यात 21.73 टक्के वृद्धी झालेली होती.
फुकट्या प्रवाशांत वाढ
एप्रिल 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत फुकट्या प्रवाशांविरोधात 19.82 लाख गुन्हे दाखल झाले आहेत. जे गेल्या वर्षी केवळ 16.37 लाख होते. त्याच्या तुलनेत ऑक्टोबर 2017 मध्ये फुकट प्रवास करणार्यांविरोधात 3.39 लाख गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी वसूल केलेला दंड हा 80.02 कोटी रुपये एवढा होता. तर यावर्षी 100.67 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जो 25.81 टक्क्यांनी जास्त आहे.