मर्चंट नेव्हीचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे पैसा आणि विदेशात प्रवास. एक म्हणजे आकर्षक पगार मिळतो जो करमुक्त असतो अगदी लहान वयातच तुम्ही एक मोठ्ठा पगार मिळवायला लागता. उदा. ऑइल टँकरवरच्या 22 वर्षांच्या थर्ड ऑफिसर किंवा फोर्थ इंजिनीअरला (जे जहाजावरील सर्वांत कनिष्ठ अधिकारी असतात) जवळपास 1500 यूएस डॉलर्स/महिना (एक लाख भारतीय रुपये) एवढा पगार असतो. मर्चंट नेव्ही हे युद्धप्रवण नसलेले एक वेगाने विकसित होणारे व्यावसायिक क्षेत्र आहे जे समुद्रातील मालवाहक कार्गो आणि कधीकधी पॅसेंजरशी संबंधित असते. त्यामुळे या करिअरमध्ये पॅसेंजर व्हेसल्स, कारगो लायनर्स, टँकर्स, कॅरिअर्स तसेच इतर अनेक प्रकारची वाहने यांचा समावेश होतो. या क्षेत्रातील करिअरमध्ये भरपूर साहस दाखवण्याची व विदेशातील शहरांमध्ये जलप्रवास करण्याची संधी मिळते. सर्वांत शेवटी हे एक भरपूर पगार मिळवून देणारे व आशादायक बढतीच्या संधी मिळवून देणारे एक किफायतशीर व उत्तेजित करणारे करिअर आहे. मर्चंट नेव्हीतील करिअर हे दिवसेंदिवस एक साहसी करिअर होत चाललेले आहे. हे तेथील एक साहसी जीवनच आहे. भविष्यातील संधी-एक गोष्ट इथे समजून घेणे आवश्यक आहे की मर्चंट मरीनरला जीवनभर जहाजावरच राहण्याची गरज नाही. त्यांच्याकरिता बर्याच अशा संधी आहेत, ज्यामुळे ते किनारी भागातदेखील राहू शकतात.
आंतरराष्ट्रीय शिपिंग उद्योगाच्या माध्यमातूनच 90% पेक्षा जास्त जागतिक बाजारपेठ वाहतूक केली जाते. शिपिंग ही जागतिक अर्थव्यवस्थेची किल्ली आहे. शिपिंगशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा मालाची वाहतूक आणि खाद्य पदार्थांची तसेच तयार खाद्य मालाची आयात/निर्यात शक्यच झाली नसती. अर्धे जग उपाशी राहिले असते, तर अर्धे जग गारठले असते.
जहाजावरील मुख्य विभाग किंवा विंगमध्ये जलवाहतूक(नेव्हिगेशन) विभाग किंवा विशिष्ट अधिकारी आणि इंजिन विभाग किंवा इंजिन अधिकारी अशी व्यवस्था असते. जलवाहतूक विभाग जहाजवाहतूक, कार्गोमध्ये माल भरणे किंवा खाली करणे, सर्वसाधारण देखभाल आणि जहाजाचे व्यवस्थापन यांकडे लक्ष पुरवते. अधिकारी हे थर्ड ऑफिसर म्हणून नोकरी सुरू करतात व काही दिवसांनंतर त्यांना सेकंड ऑफिसर, नंतर मुख्याधिकारी आणि शेवटी जहाजाचा मास्टर म्हणून बढती मिळते. अर्थात, ही बढती वैयक्तिक पातळीवर क्षमता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तसेच त्यांचे जहाजावरील काम पाहून दिली जाते.
जलवाहतुकीच्या कामाशिवाय तिसरा अधिकारी जीवरक्षक उपकरणांकडे लक्ष देतो, दुसरा अधिकारी मार्ग नियोजन आणि जलवाहतूक उपकरणे, औषधे आणि आरोग्याशी संबंधित गोष्टी याकडे लक्ष देतो तर मुख्य अधिकारी कारगो भरणे व खाली करणे याकडे तर मास्टरकडे संपूर्ण जहाजाची जबाबदारी असते. इंजिन विभागाचे अधिकारी हे मरीन इंजिनीअरिंगचे पदवीधारक असतात. ते चौथा इंजिनीअर म्हणून नोकरी सुरू करतात आणि पायरी-पायरीने तिसर्या, दुसर्या आणि मुख्य इंजिनीअर म्हणून प्रगती करतात. अर्थात त्यांना परीक्षा उत्तीर्ण तसेच जहाजावरील कार्य यांच्या कसोटीला उतरावेच लागते. इंजिनीअरिंग विभागाला मुख्य इंजिनाशिवाय त्याच्या बरोबरीने येणारी उपकरणे जसे पॉवर जनरेशन इक्विपमेंट, कारगो पंप, आणि एसी.. इत्यादी यांचीही देखभाल करावी लागते. चौथ्या इंजिनीअरवर इंजिनाचे चलनवलन आणि इंजिन खोलीतील इतर सहाय्यक उपकरणांच्या देखभालीचीही जबाबदारी असते. त्यानंतर तिसरा इंजिनीअर व दुसरा इंजिनीअर असतात. याशिवाय तिथे इलेक्ट्रिकल ऑफिसर असतो जो इलेक्ट्रिकल उपकरणांची देखभाल करतो.
मर्चंट नेव्हीमध्ये कंटेनर शिप्स, बल्क कॅरिअर्स, ऑइल टँकर्स आणि केमिकल टँकर्स या चार प्रकारची जहाजं असतात. मर्चंट नेव्ही हे एक जास्त पगार असणार्या काही करिअर्सपैकी एक आहे. पगार हा 15,000 ते 9 लाख वर्षाकाठी असा राहू शकतो. कारण पगाराची रचना कंपनी, शहर, आयात-निर्यातीची गरज इत्यादीनुसार वेगवेगळी असते. पगाराच्या फायद्याशिवाय यामध्ये आणखीही काही लाभ आहेत जसे कराचे फायदे, भरपूर सुट्या किंवा लंबी रजा, शिस्तबद्ध जीवनशैली, शैक्षणिक योग्यता कमी चालते, प्रेरणादायी साहस दाखवण्याच्या भरपूर संधी. मर्चंट नेव्हीच्या भारतात व भारताबाहेर भरपूर संधी उपलब्ध आहेत. ते विशेष प्रकारचे असल्यामुळे सामान्य विद्यार्थी व पदवीधारकांनी जहाजावर जाण्याअगोदर प्रशिक्षण घेणे गरजेचे ठरते. जर कुणाला अधिकारी बनायचे असेल तर त्याला प्री-सी कोर्सेस करून कॅडेट बनावे लागेल.
विद्यार्थी 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्याने फिजिक्स-केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा इतर, तो डेक कॅडेट किंवा इंजिन कॅडेटला जाऊ शकतो. एखादा मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा नेव्हल आर्किटेक्चरचा विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएट मरीन इंजिनीअरिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतो. डेक कोर्सेसचे महत्त्व थोड्याच दिवसात वाढत जाऊन त्याला कॅप्टन ही पदवी मिळू शकते तर इंजिनीअर हा मुख्य इंजिनीअर होऊ शकतो. 1 वर्षाचा प्री-सी-डिप्लोमा – अप्लाइड नॉटिकल सायन्स जो बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स ही पदवी मिळवून देतो तो तरुणांसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये 1 वर्ष कॅम्पस स्टडी असते ज्याच्यानंतर 18 महिने जहाज प्रशिक्षण असते. त्याकरिता वयोमर्यादा कोर्स सुरू होतेवेळी 17 ते 20 वर्षे असली पाहिजे. बीएससी, पीसीएम किंवा इलेक्ट्रॉनिक्स करणार्या तरुणांचे वय 22 पेक्षा जास्त नसावे. बीई/बीटेक (आयआयटी किंवा मान्यताप्राप्त कॉलेज) झालेल्या तरुणांचे वय 25 पेक्षा जास्त नसावे. हे कोर्सेस दर वर्षीच्या ऑगस्ट व फेब्रुवारीमध्ये सुरू होतात. मरीन इंजिनीअरिंगच्या 4 वर्षाच्या बीटेकसाठी वयोमर्यादा ही कोर्स सुरू होतेवेळी 17 पेक्षा कमी नसावी आणि 20 पेक्षा जास्त नसावी. या कोर्ससाठी 60%पीसीएम् हे कमीत कमी असावे लागते. याशिवाय 1 वर्षाचे प्री-सी-ट्रेनिंग पदवीधरांसाठी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग). वयोमर्यादा 25 पेक्षा जास्त नसावी आणि पदवी – बीई-मेकॅनिकल इंजिनीअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल आणि ऑटोमेशन- एआयसीटीई/यूजीसीच्या अखत्यारीतील विद्यापीठ – शेवटच्या वर्षाला कमीत कमी 55% गुण असावेत. बी.टेक.- मरीन इंजिनीअरिंग ज्यामध्ये विद्यार्थी एकदम बी.टेकच्या दुसर्या वर्षात प्रवेश घेऊ शकतो. वय 22 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी दुसर्या कोणत्याही पर्यायी योजनेद्वारे (डायरेक्टर जनरल शिपिंगचे मान्यताप्राप्त) पहिले वर्ष उत्तीर्ण झाला असेल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल शाखेतील प्रथम वर्ष सरासरी 60% गुणांनी उत्तीर्ण केलेले असेल किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा इंजिनीअरिंग केलेले असेल (शाखा- मरीन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – एआयसीटीई मान्यताप्राप्त) तर तो मरीन इंजिनीअरिंगच्या दुसर्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश हा संपूर्णपणे भारतभर घेतल्या जाणार्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेनुसार दिला जातो ज्याच्यानंतर मुलाखत, सायकोमेट्रिक टेस्ट आणि मेडिकल टेस्ट द्यावी लागते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्याही संस्थांतर्फे सगळ्या यशस्वी उमेदवारांना कॅडेट किंवा बोर्ड शिपवर नोकरी मिळू शकते.