मर जवान, मर किसान?

0

कृषिप्रधान देशात बळीराजाला संपावर जाण्यास या सरकारने भाग पाडलय यासारखे दुर्दैैव नाही. बळीराजाच्या संपाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. संपाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल. पोलिसांना अश्रूधूर आणि लाठीमार करावा लागला, तर कुठे गाड्याची तोडफोड झाली. यातील सगळ्यात वेदना आणणारा कुठला प्रकार घडला असेल, तर भाजीपाल्याची आणि दुधाची झालेली धासधूस. पण यातून शेतकर्‍याचेच आर्थिक नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर संघर्षयात्रा काढली, शिवसेनेने संवाद अभियान राबवले, तर खासदार राजू शेट्टीच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने आत्मक्लेश यात्रा काढली आणि आता बळीराजा संपावर गेलाय. तरीसुद्धा फडणवीस सरकारच्या संवेदना काही केल्या जाग्या होत नाहीत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांचा निर्णय सरकार ठोसपणे घेऊ शकलेली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे शेतकरी संपाच्या आडून हिंसक वळण लावीत असल्याचा सनसनाटी आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. पण ज्या वेळी भाजप विरोधी पक्षात होती आणि आताचे सत्तेत होते, त्यावेळी भाजप यापेक्षा वेगळ काय करीत नव्हती. तेसुद्धा शेतकर्‍यांना फूस लावण्यात पुढेच होती हे कदाचित मुख्यमंत्री विसरलेले दिसतात. शेतकर्‍यांच्या संपाला राजकीय रंग देण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मागण्या रास्त असतानाही मुख्यमंत्री त्या मान्य का करीत नाहीत हाच खरा प्रश्‍न आहे. हे सरकार शेतकर्‍यांचे आहे अशी एकीकडे वल्गना करायची आणि दुसरीकडे शेतकर्‍याच्या संपात फूट पाडून त्यांना वार्‍यावर सोडायचे, अशी सरकारची डबल नीती लपून राहिलेली नाही. त्यातच सरकारमधील मित्र पक्ष असलेली शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघाने सरकारविरोधात दंड थोपटले आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरून सरकारवर प्रहार करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. त्यामुळे एकीकडे सत्तेची फळं चाखायची आणि राज्यकत्यार्ंना दोष द्यायचा असा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा कार्यक्रम सुरू आहे.

शिवसेनेकडे ठोस भूमिका नसल्याने त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर पडली आहे हे वेगळं सागण्याची गरज नाही. दोन-अडीच वषार्ंत सुमारे नऊ हजार शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे. प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे, अशावेळी शेतकर्‍यांच्या आत्महत्येची ही आकडेवारी मनसुन्न करणारी आहे. तिकडं सीमेवर जवान मरताहेत, इकडं बळीराजा आत्महत्या करतोय. ज्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत ज्या बळीराजामुळे आपण जगत आहोत. त्यांची अवस्था इतकी वाईट झालीय. माजी पंतप्रधान लाल बहादूरशात्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. देशाच्या सीमेचे रक्षण जवान करतील तर पालन पोषण किसान करतील हाच या मागचा उद्देश असावा. त्यामुळे जवान आणि किसान हे देशातील सर्वात महत्त्वाचे आहेत. पण सध्या त्यांचेच हाल सुरू आहेत. देशात चाललंय तरी काय. केंद्रातील मोदी सरकार असो वा राज्यातील फडणवीस सरकार दोघांच्याही संवेदना बोथट झाल्या आहेत. त्यांची जवान आणि किसान (शेतकरी) यांच्याबाबतची धोरणे वा भूमिका ही मर जवान, मर किसान या गोष्टींना प्रोत्साहन देणारी तर नाही ना, अशी शंका जनतेला येऊ लागली आहे. दोन दिवसांपासून बळीराजाच्या संपाचे तीव्र पडसाद उमटले. तिसर्‍या दिवशी शेतकर्‍यांचा संप मिटल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण आजही पुणतांब्यातील शेतकरी संपाच्या बाजूने उभे ठाकले आहेत. संपात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

कर्जमाफीविषयी बोलताना मुख्यमंत्री आधी म्हणाले देणार नाही. मग म्हणाले, केंद्रातून देऊ. आता म्हणत आहेत, छोट्या-मोठ्यांना देऊ. त्यामुळे मुख्यमंत्रीच संभ्रमित असल्याचे दिसून येत आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या सत्तेला तीन वर्षे पूर्ण झाली. या काळात काश्मीरच्या खोर्‍यातील हिंसाचारात 198 जवानांना शहीद व्हावे लागले, तर 91 नागरिकांचा बळी गेला आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात देशभरात सुरक्षा दलाच्या 278 जवानांना बलिदान द्यावे लागले तर 442 नागरिकांना प्राणाला मुकावे लागले आहे. शिवाय पूर्वोत्तर राज्यांतील हिंसाचारात 99 जवानांसोबत 344 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानने 1 हजार 343 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे तसेच 172 वेळा दहशतवादी हल्ले केले आहेत. ही आकडेवारी मन सुन्न करणारीच आहे. दररोज किती जवान शहीद होणार आणि आम्ही काय फक्त बघ्याची भूमिका घेणार आहेात का? पण अजूनही भाजप सरकारचे डोळे अजूनही उघडत नाहीत. सत्तेचा माज आल्यासारखी भाजपची मंडळी वागत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांविषयी आणि जवानांविषयी अपशब्द बोलली जात आहेत. देशाच्या सीमा जवानांनी सांभाळाव्यात आणि देशातल्या जमिनी किसानांनी पिकवाव्यात. तोफा नि बंदुकांइतकेच आपल्या देशात नांगराचे महत्त्व आहे. म्हणूनच जवान आणि किसान हे खर्‍या अर्थाने मातृभूमीचे रक्षक आहेत, हे सत्तेचा माज आलेल्या भाजप सरकारच्या डोक्यात कधी शिरेल ?

संतोष गायकवाड – 9821671737