वाळू वाहतुकीसाठी स्वीकारली सात हजारांची लाच ; अकोला एसीबीची धडक कारवाई
मलकापूर : गौणखनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून सात हजाराची लाच स्वीकारताना मलकापूरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षकासह सहाय्यक निरीक्षक व एका पोलीस कर्मचार्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारासच स्थानिक पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
पोलीस ठाण्यात एसीबीचा ट्रॅप
गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय करणार्या मलकापूरातील 26 वर्षीय तक्रारदारास तीन टीप्परसाठी पोलीस अधिकार्यांनी प्रत्येकी तीन हजाराप्रमाणे एकूण नऊ हजारांची लाच मागितली तर त्यात तडजोड होवून सात हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. मलकापूर पोलीस ठाण्यात सकाळी 10.30 वाजता तक्रारदाराने पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद इम्तीयाज याच्या हातात रक्कम दिली तर नंतर ही रक्कम वरीष्ठ पोलिस निरीक्षक अंबादास हिवाळे यांना दिल्यानंतर त्यांनी ती रक्कम स्वत:च्या खिशात टाकल्यानंतर उभयंतांना अटक करण्यात आली.
सहाय्यक निरीक्षकही आरोपी
दोन दिवसांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव खांडेकर यांच्या भ्रमणदूरध्वनीवरून तक्रारकर्त्यांशी संवाद साधला असल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला एसीबीचे पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण करीत आहेत.