संयुक्त राष्ट्रे (यूएन) : नोबेल पुरस्कार विजेता मलाला युसुफझाईची निवड युनोच्या शांतीदूतपदी करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली. मलालाच्या हातून लहान मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत आहे असे गुटेरेस यांनी म्हटले. सोमवारी याबाबतची औपचारिकता पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मलालाने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्या द्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते. अफ्रिकन देश असो वा मध्य आशिया देश असो तिच्या संस्थेतर्फे शिक्षणाचे कार्य सर्व ठिकाणी केले जाते. तिचे या कार्यातील समर्पण पाहूनच तिला हा पुरस्कार देण्यात आल्याचे गुटेरस यांनी म्हटले.
शिक्षणप्रसाराच्या कार्याची जागतिक दखल
2012 मध्ये मलाला युसुफझाईला तालिबानी दहशतवाद्यांनी ठार करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणार्या मलालाविरोधात तालिबानचे दहशतवादी होते. या भागात शिक्षणाचा प्रसार थांबव असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते; परंतु मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण घेणे आणि त्याचा प्रसार करणे थांबवले नाही. तिच्या या कृत्यावर चिडून जाऊन दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. तिच्या या कार्याची दखल घेत नोबेल कमिटीने तिला शांततेचा 2014 सालचा नोबेल पुरस्कार दिला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली. भारताच्या कैलाश सत्यार्थींनादेखील हा पुरस्कार देण्यात आला होता.