‘मलावी’ आंब्याची नागरिकांना भुरळ

0

प्रतिडझनास 1,500 ते 1,800 रुपयांचा भाव

पुणे : आफ्रिकेतून आलेल्या मलावी आंब्याने पुणेकरांना भुरळ घातली आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात पहिल्यांदाच आवक झालेला हा आंबा उत्तम दर्जाचा, गोड आणि टिकाऊ आहे. त्यामुळे शहरासह उपनगर, जिल्ह्यातून त्याला मोठी मागणी आहे. कोकणच्या आंब्याचा नियमीत हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होणार असला, तरी या आंब्याची एकदिवसाआड नियमीत आवक होत आहे. घाऊक बाजारात आंब्याला प्रतिडझनास 1 हजार 500 ते 1 हजार 800 रुपयांचा भाव मिळत आहे.

आफ्रिकेतील मलावीमध्ये कोकणसदृश्य हवामान असल्याने 2013 साली कोकणातून वाण नेऊन हापूस आंब्याची लागवड करण्यात आली. मलावीमधील हवामान आंब्यांना पोषक ठरल्याने त्याठिकाणी लागवड झालेल्या कलमांना कोकणातील हापूससारखेच आंबे लागले आहेत. सध्यस्थितीत दर तीन दिवसांनी सरासरी 500 डझन आंबे हवाईमार्गाने मुंबईत दाखल होत आहे. सुरूवातीला आलेला हा आंबा कस्टमच्या कचाट्यात सापडल्याने एक आठवडा तिकडेच अडकला होता. मात्र, सर्व अटींची पूर्तता झाल्यावर तो सोडण्यात आला. आता, मात्र हा आंबा नियमितपणे मार्केटयार्डातील फळबाजारात येत असल्याची माहिती आंब्याच्या व्यापार्‍यांनी दिली. त्याचे भाव काहीसे चढे असल्याने त्याला उच्च वर्गाकडून विशेष मागणी असल्याचेही खैरे यांनी सांगितले.

कोकणातूनही हंगामपूर्व आवक

कोकणातून पावस आणि मिरे बांदर या भागातून अल्प प्रमाणात हंगामपूर्व आंब्याची आवक होत आहे. आठवड्याला 5 ते 6 डझनाच्या 3 ते 4 पेटी आंब्याची बाजारात आवक होत आहे. त्याच्या प्रतिपेटीस 8 ते 11 हजार रुपये भाव मिळत आहे. दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हंगामपुर्व हापूस आंबा बाजारात दाखल होतो.