हाफिज सईदचे पाकिस्तानला आव्हान
नवी दिल्ली । मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि कायद्याने बंदी घातलेल्या जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद पुन्हा चवताळला आहे. त्याने तर आता थेट पाकिस्तान सरकारला उघड आव्हानच दिले आहे. मला अटक करून दाखवाच, असे त्याने म्हटले आहे. जर पाकिस्तान सरकारला मला अटक करायची असेल तर त्यांनी मला अटक करावी; परंतु एक लक्षात ठेवा 2018 हे वर्ष मी काश्मिरींसाठी अर्पण केलेले आहे. त्यात कदापि बदल होणार नाही, अशी धमकीही त्याने दिली आहे.
सईदच्या डोक्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे ईनाम
विशेष म्हणजे, हाफिज सईदला जागतिक स्तरावरील दहशतवादी म्हणून अमेरिकेने घोषित केले असूनही सईद उघडपणे पाकिस्तानमध्ये फिरत आहे. भारतविरोधी त्याचे सतत गरळ ओकने चालू आहे. जर तुम्ही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जास्त जोमाने उसळी मारून येऊ असेही सईदने म्हटले आहे. नजरकैदेतून नोव्हेंबरमध्ये मुक्तता झालेल्या हाफिज सईदच्या डोक्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे ईनाम आहे. आमच्या कार्याची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांना आमचे दरवाजे खुले आहेत, असे त्याने म्हटले आहे. लष्कर ए तय्यबा या संघटनेने मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. ज्यामध्ये 166 जणांना प्राण गमवावे लागले. बंदी घातल्यानंतर जमात उद दावा नावाने तशाच कारवाया सुरू राहिल्याचे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शरीफ यांच्यावरही साधला निशाणा
काश्मीरप्रश्नी योग्य भूमिका पार पाडली नाही असा आरोप करत, सईदने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर निशाण साधले आहे. काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी काम करमार असाल तरच आम्ही तुम्हाला पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्न करू अशी ऑफरही सईदने शरीफना दिली आहे. अमेरिका व भारताच्या दबावामुळे आम्हाला प्रसिद्धी देण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे.