मला दहशतवाद्यांसारखी वागणूक : मेधा पाटकर

0

धार : नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना भेटण्याचीही मनाई होती. नंतर इंदूरहून कारने त्या बडवानीला जात असताना पोलिसांनी पुन्हा अटक करून धारच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. गुरुवारपासून मेधा पाटकर धारच्या तुरुंगात आहेत. शुक्रवारी त्यांना न्यायालयात उभे करता आले नाही. शनिवारी धार न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना जामीन दिला, पण उर्वरित तीनवर 17 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सरकार माझ्याशी दहशतवाद्यांसारखा व्यवहार करत आहे. माझ्यामुळे शांतता कशी भंग होईल? हे विचार करण्याच्या पलीकडचे आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यदिन तुरुंगातच जाणार
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा हा स्वातंत्र्यदिन तुरुंगातच जाणार आहे. हे सर्व शासनाच्या धोरणांमुळे होत आहे, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. सुनील यांनी केला आहे. मेधा पाटकर यांच्याविरुद्ध चार प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. पैकी एका गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाली, पण उर्वरित तीन प्रकरणांची सुनावणी 17 ऑगस्टला होणार आहे. याचाच अर्थ 14 आणि 15 ऑगस्टची रात्र त्यांना तुरुंगातच घालवावी लागेल. मेधा यांनी कॉर्पोरेट घराण्यांविरुद्ध आवाज उठवला हाच त्यांचा दोष आहे. सध्याचे सरकार कॉर्पोरेटच्या हितांना प्राध्यान्य देत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मेधा पाटकर यांच्यासारखी सामाजिक कार्यकर्ती स्वातंत्र्यदिनी तुरुंगात राहणार असून आणीबाणीनंतरचा हा पहिलाच प्रसंग असावा.

प्रकल्पग्रस्तांसाठी लढा
सरदार सरोवर धरणाची उंची वाढवल्यामुळे नर्मदेच्या खोर्‍यातील 192 गावांतील 40 हजार कुटुंबे पाण्याखाली येण्याचा धोका आहे. या कुटुंबांना सरकारकडून पुनर्वसनासाठी सोयीसुविधा द्याव्यात. पुनर्वसन म्हणून जे काही दिले त्यात फक्त नावापुरत्याच सुविधा, पत्र्याच्या खोल्या; मात्र वीज-शिक्षण-आरोग्य या मूलभूत गरजांची कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे चांगल्या सोयीसुविधांसह पुनर्वसनाच्या मागणीसाठी मेधा पाटकर यांनी 27 जुलैपासून धार जिल्ह्याच्या चिखलदामध्ये उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या 10व्या दिवसापर्यंत त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यानंतर अचानक पोलिसी बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात आले. व पाटकर यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.