‘मला पक्षावर विश्वास’; सचिन पायलट यांचे कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन !

0

जयपूर- मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक जागा कॉंग्रेसला मिळणार असल्याने याठिकाणी कॉंग्रेस सरकार स्थापन करणार आहे. मात्र कॉंग्रेससमोर मुख्यमंत्री पदाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपद कमलनाथ यांना देण्याचे फायनल झाले आहे. मात्र अद्याप राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. अनुभवी नेते अशोक गेहलोत आणि तरुण नेतृत्व सचिन पायलट यांच्यात स्पर्धा आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये स्पर्धा सुरु आहे. समर्थनार्थ काहींनी पक्ष सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान यावर सचिन पायलट यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मला पक्ष नेतृत्वावर विश्वास असून पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. पक्षाची गरिमा कायम ठेवा असे आवाहन सचिन पायलट यांनी केले आहे.

सचिन पायलट यांच्याशी जवळीक असलेले आणि राज्य काँग्रेसचे प्रवक्ता इंदर मोहन सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाच्या घोषणेला उशीर होत असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.

आज दुपारपर्यंत राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.