मला प्रचारासाठी हिंदू उमेदवारांनी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद

0

नवी दिल्ली : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांच्या विधानामुळे नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मला प्रचारासाठी हिंदू उमदेवारांनी बोलावणं बंद केलं आहे असं विधान गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या 2019 निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांना भेट देत असताना गुलाम नबी आझाद यांचं हे विधान आलं आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे की, ‘युथ काँग्रेसच्या दिवसांपासून मी अंदमान निकोबारपासून ते लक्षद्वीपपर्यंत देशभरात प्रचार करत आहे. मला प्रचाराला बोलावणारे 95 टक्के लोक हिंदू होते. मात्र गेल्या चार वर्षांत हा आकडा खाली आला असून 95 वरुन 20 टक्क्यांवर घसरला आहे’.

‘याचा अर्थ काहीतरी चुकीचं घडत आहे. आज मला लोक प्रचारासाठी बोलवण्यास घाबरत आहेत कारण त्यांना याचा मतांवर परिणाम होण्याची भीती आहे’, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजपा) गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांनी हिंदूंचा अपमान केला असल्याची टीका केली आहे.