डॉ. मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला
नवी दिल्ली : ‘मौनमोहन सिंग’ असे म्हणून ज्यांना नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या असंख्य नेत्यांनी हिणवले, ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत शांत आणि संयतपणे पंतप्रधानांना सुनावले आहे. मला जो सल्ला तुम्ही देत होतात तो तुम्हीच आता आचरणात आणा, असा टोला त्यांनी मोदींना हाणला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीसाठी ते बोलत होते. देशातील विविध घटनांवर मोदी मौन धारण करून बसल्याने डॉ. सिंग यांनी पंतप्रधानांना धारेवर धरले.
मोदींनी स्वतःचाच सल्ला अमलात आणावा!
2012 साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी याविषयावर काहीही प्रतिक्रिया न दिल्याने भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडले होते. नरेंद्र मोदी यांनीही आपल्यावर टीका केल्याचे बातम्यांद्वारे आपल्याला कळाले होते, असे डॉ. सिंग म्हणाले. निर्भया प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, की कायद्यात बदल करण्यापासून सरकारच्या हातात ज्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या त्यांनी केल्या होत्या. जम्मू-कश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि उत्तरप्रदेशातील उन्नावमधील बलात्काराच्या घटनांनंतर नरेंद्र मोदी हे काय बोलतात याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. पंतप्रधान मोदींनी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी भारताच्या मुलींना, तरूणींना न्याय नक्की मिळेल इतकेच विधान केले होते. याचे डॉ. सिंग यांनी स्वागत करतानाच मोदींनी त्यांच्या स्वत:चा सल्ल्यावर अंमलबजावणी करत अधिक बोलावे, असा खोचक सल्ला दिला. तसेच, कठुआ प्रकरणाला मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गंभीरपणे हाताळायला हवे होते. असे सांगतानाच कदाचित त्यांच्यावर मित्रपक्ष भाजपचा दबाव असेल, अशी टीकाही त्यांनी केली.
मोदी मला नेहमीच बोलण्याचा सल्ला देत होते. आता त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. त्यांनी वारंवार बोलत राहिले पाहिजे. दिल्लीत 2012 मध्ये निर्भया बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर आमच्या सरकारने बलात्काराच्या कायद्यात बदल करून हा कायदा आणखी कठोर केला होता.
– डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान