नवी मुंबई । जलतरण क्षेत्रात जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करणार्या शुभम वनमाळी या नवी मुंबईतील उदयोन्मुख जनतरणपटूचा प्रवास या क्षेत्रात येऊ पाहणार्या नव्या मुलांसाठी, तरुणाईसाठी प्रेरणादायी असाच आहे. या जलतरण प्रवासाचा आलेख मांडणारे ‘मला लाट व्हायचंय’, हे पुस्तक मंगळवार 19 जून रोजी, मुंबईमध्ये महानगरपालिका मार्ग, आझाद मैदान येथील पत्रकार भवनात भारतीय संघातील माजी कसोटी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या हस्ते सायंकाळी प्रकाशित होत आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो क्रीडापटू प्रदीप दिगवीकर, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक उत्तम केंद्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आंतरराष्ट्रीय पॅरास्वीमर राजाराम घाग, नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवाप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संग्रही ठेवावा असा संदर्भ ग्रंथ
दीपिका आणि धनंजय या शुभमच्या आईवडिलांनी लिहिलेल्या व अभय अवसक यांनी शब्दांकन केलेल्या या अनोख्या पुस्तकात शुभमने देशपरदेशात केलेल्या साहसी जलतरण प्रवासातील रोमांचकारी आठवणी – किस्से चितारलेले आहेत. याशिवाय या पुस्तकातून अशाप्रकारच्या विविध जलतरण उपक्रमांत सहभागी व्हायचे असलेल्या इच्छुकांसाठी संपर्क संदर्भ तसेच उपयोगी माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ शुभमच्या साहसी जलतरण प्रवासाचा रंजक आढावा घेणारे नाही तर नव्या जलतरणपटूंसाठी तो संग्रही ठेवावा, असा संदर्भ ग्रंथही ठरणार आहे.
इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटलिना चॅनल, मॅनहटन आईसलँड स्विम अशा परदेशातील अनेक साहसी समुद्र सफरी प्रतिकूल परिस्थितीत व वातावरणात पूर्ण करणारा एकमेव भारतीय जलतरणपटू असा मानसन्मान मिळवणार्या शुभमची प्रत्येक सफर म्हणजे रोमांचकारी व नावीन्यपूर्ण असा अनुभव होता. याच अनुभवांचा संकलित खजिना या पुस्तकाच्या रूपाने खुला होत असून केवळ जलतरणपटूच नाही, तर सर्व प्रकारच्या क्रीडापटूंमध्ये हे अनुभव संघर्ष करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची नवी उमेद जागवणारे आहेत. म्हणूनच या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार प्रकाशनच्या वतीने प्रकाशक प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.