मला संघाबाहेर ठेवा, झुलनचा खुलासा

0

कोलकाता । आयसीसी महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे निराश झाले होते, त्यामुळे मला संघाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवा अशी विनंती संघाचे मार्गदर्शक तुषार आरोठे यांना केली होती, असा खुलासा पश्‍चिम बंगाल क्रिकेट संघटनेच्या वार्षिक समारंभात बोलताना भारतीय संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने केला.

यावेळी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते झुलनला गौरवण्यात आले. नेताजी इंडोअर स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना झुलन म्हणाली की, विश्‍वचषक स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खराब खेळ झाला होता. त्यामुळे वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्याच्यावेळी गोलंदाजी व्यवस्थित होत नसल्यामुळे तुम्ही संघातून वगळू शकता असे आरोठे यांना सांगितले. पण, तू मला संघात पाहिजेस आणि तुच गोलंदाजी करशील, असे आरोठे यांनी सांगितले. आरोठेंच्या या बोलण्यातून चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुलनच्या एका अप्रतिम चेंडूने कर्णधार मेग लिनींग शून्यावरच बाद झाली होती. भारताने हा उपांत्य फेरीचा सामना 36 धावांनी जिंकला होता. झुलन म्हणाली की, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आमच्यासाठी महत्वाचा होता. लेनिंगही सर्वोत्तम क्रिकेपटूंपैकी एक आहे. तिला योग्य ठिकाणी गोलंदाजी करण्याचे ठरवले होते. मितालीलाही तसे सांगितले. तिनेही काही माहिती दिली आणि सुदैवाने सगळ आम्हाला पाहिजे होते तसे घडले.