मला संपवण्यासाठी पक्षातील हितशत्रुंचा डाव

0

धुळे। स्थानिक भाजपामधील सुंदोपसुंदी आणि त्यांची पक्षांतर्गत होणारी घुसमट आ.अनिल गोटे यांनी जाहिररित्या पत्रकार परिषदेत बोलून दाखविली आहे. मार्केटसंदर्भातील स्थिती आणि प्रगती यावर भाष्य करतांना त्यांनी थेट स्वपक्षातील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनाच टार्गेट केले. मार्केटचे काम व्हावे, यासाठी मी आग्रही असल्यानेच ते या कामात कोलदांडा घालत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला आहे. शहर विकासाशी आणि येथील व्यापारी, जनतेशी त्यांना काही देणे घेणे नसून आपापसात वाटा पाडून घेत घाटा मात्र महापालिकेच्या माथी मारण्याचा त्यांचा डाव आहे, असा घणाघाती टोलाही त्यांनी राज्यमंत्री डॉ.भामरेंना लगावला. पक्षात येत असलेल्यांबद्दल विचारले असता, गोटे म्हणाले की, ज्यांच्याशी मी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. त्या माझ्या विरोधकांना भाजपत घेऊन पवित्र करण्यात येत आहे. यातून माझा गेम करण्याचा माझ्याच पक्षातील काही हितशत्रुंचा डाव असल्याचे ते सांगायला विसरले नाहीत.

आयुष्याच अर्धशतक अशाच लोकांमध्ये गेले
तो यासाठीच की, माझ्या पक्षात माझ्याविरुद्ध बोलणार्‍यांची संख्या वाढवायची. आठवडा-दोन आठवड्यांनी त्यांना मुंबई वारी घडवून माझ्याविरुद्ध जेव्हढे काही सांगता येईल, तेव्हढे वरिष्ठांना सांगावे, हे न समजण्याइतका मी बालीश नाही. आयुष्याच अर्धशतक अशाच लोकांमध्ये गेले. पण विरोधकांची अंधारात तडजोड करुन पक्षाशी गद्दारी करण्याचा विचार माझ्या मनाला कधी शिवला नाही. तसा मोह कधी झाला नाही. बहुपतीत्व ही संकल्पनाच मला शिसारी आणते. माझ्या सर्व विरोधकांना आव्हान आहे की, आता तुम्हाला नव्या दमाची रसद मिळाली आहे. अभी और जोरसे लढो, मजा आयेगा, अल्ला ताला आपको कायमाबी बरसे असे म्हणत गोटेंनी आपले मनोगत संपविले. यावेळी योगेश मुकुंडे,भीमशिग राजपूत,तेजस गोटे,दिलीप साळुंखे,संजय बोरसे,अमित खोपडे आदींची उपस्थिती होती.

जेसीबी पाठवून हे मार्केट जमिनदोस्त करण्याचा घाट
पाचकंदिल परिसरात असलेल्या चार मार्केटसह धान्य बाजार मिळून स्वतंत्र अशी सात मजली इमारत नव्याने उभी राहू शकते. यासाठी तेथील व्यापार्‍यांना एकत्र करुन विश्‍वासात घेवून ही योजना राबविणे संयुक्तिक ठरले असते. मात्र, तसे न करता प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबी पाठवून हे मार्केट तातडीने जमिनदोस्त करण्याचा घाट घातला गेला. विशेष म्हणजे ही जागा महापालिकेच्या नावावर नसतांना किंवा रिक्त नसतांना याठिकाणी बीओटी तत्वावर टेंडर काढण्यात आले. नियोजनाप्रमाणे ठराविक ठेकेदारांचेच टेंडर आले. त्यातून काहींनी दुकाने तर काहींनी रोकडा शिधा घेण्याचे निश्‍चित करुन त्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, तेथील व्यापार्‍यांनी ऐनवेळी का होईना आपणास फोन केल्याने या गोष्टीची माहिती मिळाली. परिणामी, आपण तातडीने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यांनी पावसाळ्याचा आधार घेत स्थगितीही दिली. शिवाय, या प्रश्‍नाचा निकाल लावण्यासाठी नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेत सात सदस्यीय समितीही नियुक्त केली.

गाळ्याचे भाडे उत्पन्न म्हणून करावे वसुल
मात्र, मनिषा म्हैसकर यांना पुरेसा वेळ नसल्याने त्यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना ही जबाबदारी सोपविण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली, ती त्यांनी मान्य केली. त्यानुसार आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर आदी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्तांनी असे सूचित केले की, त्या व्यावसायिकांकडे आजमितीस असलेल्या क्षेत्रफळाच्या दीडपट आणि शक्य असेल तर दुप्पट क्षेत्रफळाचा गाळा त्यांना विनामोबदला द्यावा. मात्र, गाळ्याचे भाडे मनपाने उत्पन्न म्हणून वसुल करावे. त्यासाठी गरज भासल्यास वाढीव एफएसआय मिळवून देण्याची जबाबदारीही आयुक्तांनी स्विकारली. तसेच या काळात व्यापार्यांचे तात्पुरते पुनर्वसन करावे. मात्र, या सूचनावजा आदेशावर आजपर्यंत तरी ना जिल्हाधिकारी ना आयुक्त महापौर यांनी कुठला अहवाल तयार केला. ना तो शासनाला पाठविला. त्यातच संरक्षण राज्यमंत्री यांनी महापालिकेत भूयारी गटारी योजनेचा आणि 136 कोटींच्या पाणी योजनेचा लष्करी स्थितीत अधिकार्‍यांना धारेवर धरुन परेड घेत आढावा घेतला.

पुढील अ‍ॅक्शनप्लॅन ठरेल
त्यानंतर एकदा मुंबईहून धुळ्याकडे येतांना मध्येच नाशिकला डेरेदाखल होत राज्यमंत्र्यांनी आयुक्तांसह इतरांना नाशिकला बोलवून बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी व्यापार्यांचे पुनर्वसन करण्याबाबत समिती निर्णय घेईल. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक होवून पुढील अ‍ॅक्शन प्लॅन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलून आपण काही वेगळे केलं तर आपणास एफएसआय केवळ एकच मिळेल, ही बाब त्यांना समजावून सांगितली. मात्र, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. उलट राज्यमंत्र्यांसह महापौरांनी एकच घोषा लावून फक्त एकच मार्केट करा, प्रत्यक्षात पाच मार्केट करणे कठीण असल्याचे सांगितले. त्यामुळे 150 कोटींचा हा प्रकल्प धुळेकरांच्या हातून निसटणार आहे.अन्य राजकीय पक्षात जे माझे विरोधक आहेत. जे सतत माझ्याविरुद्ध गरळ ओकतात, अशा असंतुष्ट आत्म्यांना माझ्या पक्षात प्रवेश देवून पवित्र करुन घेण्याचा सपाटा पक्षातीलच एका गटाने चालविला आहे.